Sunday, June 14, 2026
HomeराजकीयNarendra Patil : अजित पवार, छगन भुजबळ यांच्यामुळे 15 हजार मराठा तरुणांचे...

Narendra Patil : अजित पवार, छगन भुजबळ यांच्यामुळे 15 हजार मराठा तरुणांचे नुकसान; नरेंद्र पाटलांचा आरोप, काय आहे प्रकरण?

मुंबई । Mumbai

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच महामंडळाचे पोर्टल जाणीवपूर्वक बंद ठेवले जात असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून महामंडळाचे पोर्टल (वेबसाईट) बंद आहे. यामुळे सुमारे १५ हजार मराठा तरुणांना मोठा फटका बसला असून ते लाभापासून वंचित राहिले आहेत. पाटलांच्या म्हणण्यानुसार, पोर्टल बंद ठेवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे कटकारस्थान आहे. व्यवस्थापकीय संचालक (MD) विजयसिंह देशमुख यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार हे पोर्टल बंद ठेवल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना नरेंद्र पाटील म्हणाले, “अजित पवारांकडे काही मागितलं की त्यांना वाटतं मी पैसे मागायला आलोय, त्यामुळे ते कायम चिडचिड करतात.” या चिडचिडीमुळेच मराठा तरुणांच्या विकासाशी संबंधित कामे थांबवली जात असल्याचा त्यांचा रोख होता. १ ऑक्टोबरपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची वेबसाईट पूर्णपणे बंद आहे. यामुळे लाभार्थ्यांची नोंदणी, कर्ज प्रक्रिया, पात्रता प्रमाणपत्र वाटप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्याज परतावा यांसारखी सर्व महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक तरुणांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे होते किंवा नवीन वाहन खरेदी करायचे होते. मात्र, पोर्टल बंद असल्याने त्यांना ही महत्त्वपूर्ण आर्थिक संधी गमवावी लागली.

पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ नाशिक जिल्ह्यामध्येच १६ हजारहून अधिक तरुण या लाभांपासून वंचित राहिले आहेत. राज्यभरातील वंचित आणि गरजू लाभार्थ्यांचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महामंडळाच्या कारभारावर आक्षेप घेताना नरेंद्र पाटील यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. महामंडळाच्या नावाने सुमारे ३०० ते ३५० कोटी रुपयांपर्यंतचा निधी बँकांमध्ये ठेवला जातो. हा निधी व्याजाच्या परताव्यासाठी वापरण्याऐवजी, काही अधिकारी या निधीतील पैसे बँकांमध्ये ‘पार्क’ करून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

या सर्व गंभीर बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेशाद्वारे दिली असून, मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही याबद्दल कळवले आहे. नरेंद्र पाटील यांनी केलेल्या या थेट आरोपामुळे राज्याच्या राजकारणात, विशेषतः मराठा आरक्षणाशी संबंधित वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ काय उत्तर देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...