नाशिक | Nashik
येवला-नांदगाव मार्गावरील (Yeola-Nandgaon Highway) सोमठाणे घाटात आज (मंगळवारी) सकाळी मध्य प्रदेशातील एक खाजगी लक्झरी बस चालकाचे नियंत्रण सुटून उलटल्याने भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला असून, २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बस रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तासनतास पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही खाजगी लक्झरी ट्रॅव्हल्स बस मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) असून, २५ ते ३० प्रवाशांना घेऊन जात होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बस सोमठाणे जोश घाटातून जात असताना, अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव वेगातील बस थेट रस्त्यावरच पलटी झाली. अपघात (Accident) होताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे मदतकार्य सुरू केले.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले असून, त्यापैकी ५ ते ६ गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे (Hospital) नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (Nandgaon Rural Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाहतूक झाली होती ठप्प
अपघात इतका भीषण होता की, लक्झरी बस थेट रस्त्याच्या मधोमध आडवी झाली. यामुळे येवला-नांदगाव मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले. अपघाताचे नेमके तांत्रिक काय होते, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.




