ओझे | वार्ताहर | Oze
नांदुरी कळवण मार्गावर (Nanduri-Kalwan Highway) मंगळवार (दि.२८) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पायरपाडा येथे भरधाव अज्ञात माल वाहतूक वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप उसळला होता. तसेच अपघातानंतर चालक फरार झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, या अपघातात (Accident) प्रकाश दौलत भरसट (वय ४५, रा. पायरपाडा) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सतंप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी रास्ता रोको केले. या आंदोलनामुळे वणी–नांदुरी कळवण मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. मयत प्रकाश भरसट मुळचे शेतकरी कुटुंबातील होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ते पायी गावाकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की भरसट यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याच्या (Vani Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व किरण जगदाळे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सुमारे १५० ते २०० ग्रामस्थांनी अपघात करणाऱ्या चालकाला तात्काळ अटक करा या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत रस्ता अडवून आंदोलन केले. तसेच या मार्गावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी देखील आंदोलन कर्त्यांनी केली.
दरम्यान, या आंदोलनामुळे वणी–नांदुरी कळवण मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या (Vehicles) लांबच लांब रांगा लागल्या. रात्री उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत राहिल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. यानंतर अनेकांनी नातेवाईकांशी मध्यस्थी करून पोलिसांकडून ‘वाहन लवकरात लवकर शोधून कारवाई करू, असे लिहून घेतले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली व उशिरा वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
भरसट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
प्रकाश भरसट हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व सुना असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने भरसट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून,गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे वणी–नांदुरी कळवण मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर येत आहे. या ठिकाणी वळणावर खोलगट रस्ता असून,समोरून येणारे वाहन समजत नाही. यावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





