नाशिक | Nashik
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातसोबत फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा देखील मलीन झाली होती. तसेच पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वरिष्ठाकडे केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
अशातच आता राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. “महिलांचा छळ करणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकत नाही,” असे महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, नाशिकमधून (Nashik) सुरू झालेले राष्ट्रवादीतील (NCP) हे बंड आता राज्यस्तरावर काय वळण घेते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) याबाबत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महिला आघाडीतील हा अंतर्गत कलह पक्षाला महागात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पक्षाची प्रतिमा डागाळल्याचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या पत्रात नाशिकच्या महिला पदाधिकार्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यात म्हटले की, “एकीकडे पक्ष महिलांच्या सन्मानाची भाषा करतो आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्षा छळ करणाऱ्यांचे समर्थन करतात, हे लज्जास्पद आहे. डॉ. अशोक खरात या व्यक्तीकडून अनेक महिला आणि तरुण मुलींचा छळ करण्यात आला असून, रूपाली चाकणकरांचा थेट संपर्क असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. तसेच या पत्रात केवळ खरात प्रकरणाचाच उल्लेख नाही, तर यापूर्वीचे हगवणे प्रकरण आणि संपदा मुंडे प्रकरणानंतर आता खरात प्रकरणामुळे पक्षाला प्रचंड ट्रोल केले जात आहे. महिला संघटनेत चाकणकर यांनी दोन गट पाडले आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिलांना त्या पदावरून काढून टाकत होत्या. संघटनेत खंबीर उभ्या राहणार्या नेतृत्वाची गरज आहे. गटबाजी करणाऱ्यांची नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नवीन महिला जोडणे कठीण झाले
अजित पवार हयात असताना अनेकदा प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत चर्चा केली होती, मात्र त्यांना वेळ मिळाला नाही. आता अजितदादा नाहीत. त्यामुळे सुनेत्रा वहिनींकडून अपेक्षा आहेत. त्यांनीच यात मध्यस्थी करून निर्णय घ्यावा. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेवर चालणारे लोक आहोत, पण सध्या जे समोर येत आहे ते वेदनादायी आहे. आमच्याकडे पाहून महिला पक्षात सहभागी होतात, पण अशा प्रकरणांमुळे नवीन महिला जोडणे कठीण झाले आहे. आम्ही सुनेत्रा वहिनी पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पत्र लिहून ही परिस्थिती कळवली आहे. असेही पत्रात म्हटले आहे.
पक्षाला चांगली प्रतिमा असलेल्या प्रदेशाध्यक्षाची गरज
ग्रामीण भागात आम्ही महिला कार्यकर्त्या जेव्हा लोकांमध्ये जातो, तेव्हा आम्हाला लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे. अशा कलंकित नेतृत्वाखाली काम केल्यास आमच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पक्षाला आता चांगली प्रतिमा असलेल्या प्रदेशाध्यक्षाची गरज आहे. जोपर्यंत रूपाली चाकणकर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत नाशिक जिल्हा महिला संघटना त्यांचे स्वागत करणार नाही. त्या नाशिकला आल्यावर आम्ही त्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकणार आहोत. त्या नाशिकमध्ये फिरू शकणार नाहीत,” असा इशाराही पत्राद्वारे दिला आहे.
पत्रावर प्रमुख महिला पदाधिकार्यांची स्वाक्षरी
या पत्रावर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा यांच्यासह सायरा अब्दुल शेख (देवळाली), कल्पना शिरसाठ (चांदवड), वैशाली जाधव (मालेगाव), ज्योती वाकचौरे (नाशिक), जयश्री केदार, वर्षा लिंगायत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व १५ हून अधिक तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





