नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Aher-Adke) आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळसाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप (Machhindra Sanap) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शहरातील हॉटेल सयाजी येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत बहुतांश नगरसेवकांनी महापौरपदाकरिता हिमगौरी आडके यांच्या नावाला सहमती दर्शविली.
हे देखील वाचा : Nashik Mayor Election : मोठी बातमी! भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात भरणार अर्ज
यानंतर हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चित झाले. दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदासाठी (Mayor and Deputy Mayor) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मनपा मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात आडके आणि सानप यांनी अर्ज दाखल केले. प्रत्यक्षात महापौर निवडणुकीच्या महासभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांसह अन्य वरिष्ठांच्या सल्ल्याने नावांवर अंतिम निर्णय होऊन ते मतदानाच्या दिवशी बंद लिफाफ्यात कळविण्यात येणार असल्याचे समजते.
हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार! महाजनांनी बोलावली नगरसेवकांची बैठक, कुणाला मिळणार संधी?
हिमगौरी आहेर-आडके यांची राजकीय कारकीर्द
यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधून हिमगौरी आहेर-आडके या निवडून आल्या आहेत. याआधी त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळली आहे. त्यांचे चुलत बंधु राहुल आहेर सध्या चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांचे कुटुंब हे सुरुवातीपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आहे. विशेष म्हणजे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा महापौरपदी देण्याकडे भाजपचा कल होता. त्याच निकषांवर हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित झाले. कुंभमेळा नाशिक शहरासाठी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्या निमित्ताने नाशिकचे देश भरच नव्हे, तर जागतिक पातळीवर ब्रॅण्डिंग करण्याची संधी भाजपला मिळणार आहे. त्यामुळेच प्रशासकीय समज, राजकीय तोल आणि स्वच्छ प्रतिमा असलेला महापौर देणे भाजपसाठी अत्यावश्यक होते.
हे देखील वाचा : Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी नेले महापौर पदासाठी अर्ज
आडके या गेल्या पंचवार्षिक मध्ये पहिल्या महिला स्थायी समिती सभापती झाल्या होत्या. महापालिकेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत स्थायी समिती सभापतीपदी एकदाही महिलेला संधी मिळाली नव्हती . २०१८ मध्ये पहिल्यांदाच हिमगौरी आहेर-आडके यांच्या रुपाने महिला सभापती झाली होती. त्यापूर्वी सन १९९७-९८ मध्ये बाळासाहेब आहेर स्थायी समितीचे सभापती होते. वडीलानंतर त्या सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या. सन २००२ मध्ये हिमगौरी यांच्या मातोश्री प्रा. शोभना आहेर या उपमहापौर झाल्या होत्या. तर त्यांचे काका माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर होते. तसेच त्यांचे चुलत बंधू केदा आहेर हे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष होते. माजी मंत्री दिवंगत डॉ. दौलतराव आहेर यांच्यापासून आहेर कुटुंबाचे नाशिकच्या विकासात योगदान राहिले आहे. त्यानंतर आता दुसरी पिढी महापौर या नात्याने शहर विकासात योगदान देणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह शिंदे सेनेकडून अर्ज दाखल, माघारीकडे लक्ष
मच्छिंद्र सानप यांची राजकीय वाटचाल
उपमहापौर पदासाठी नाव निश्चित झालेले मच्छिंद्र सानप हे नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले असून, ते माजी महापौर आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब सानप यांनी भाजपचे शहराध्यक्ष, उपमहापौर, महापौर आणि आमदार यासारखी पदे भूषवली आहेत. भाजपला नाशिकमध्ये सुगीचे दिवस आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. महापालिकेत १४ नगरसेवकांवरून ६६ नगरसेवक करण्यात त्यांची मोठी भूमिका होती. मात्र, २०१९ च्या विधानसभेवेळी त्यांना उमेदवारी नाकारून मनसेतून भाजपमध्ये आलेल्या राहुल ढिकले यांना तिकीट दिले. त्यावरुन सानप नाराज झाले होते. यानंतर त्यांनी आपला एक गट फोडत तात्काळ राष्ट्रवादीत प्रवेश करून विधानसभेची उमेदवारी मिळवली. मात्र, त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीतही सानप फार काही रमले नाही. त्यांनी पुन्हा पक्ष बदल करत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतही त्यांची नाराजी कायम राहिली. यानंतर बाळासाहेब यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली, तेव्हापासून ते पक्षातच काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचा मुलगा मच्छिंद्र प्रभाग क्रमांक ३ (क) मधून निवडून आले असून, त्यांनी भाजपचे बंडखोर रुची कुंभारकर यांचा पराभव केला. यानंतर आता ते उपमहापौर होणार आहेत.





