Friday, May 3, 2024
Homeब्लॉगBlog : 'नवीन तांबट' एक हसतमुख व्यक्तिमत्व

Blog : ‘नवीन तांबट’ एक हसतमुख व्यक्तिमत्व

आज तांबट सरांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत थांबले आणि शोकध्वनी सुरु झाला. सरांचा मी विद्यार्थी आणि सहकारी सुध्दा…

१९८१ साली पेठे विद्यालयात रुजू होण्यास गेलो. काहीच माहिती नाही. शाळेत प्रवेश केला आणि समोर तांबट सर दिसले. त्यांनी ओळख दिली. का आला असे विचारले. मी नेमणूक पत्र दाखवले. तांबट सरांना अतीव आनंद झाला. मला लगेच ते अधीक्षक स्व. काळे सरांकडे घेवुन गेले. माझी ओळख करुन दिली. मी पेठे विद्यालयात रुजू झालो. आता माझी ओळख तांबट सरांचा विद्यार्थी ही झाली. सरांनी मलाच मदत केली का? नाही माझे जागी कोणीही विद्यार्थी असता तरी सरांनी असेच केले असते. विद्यार्थी सरांचा श्वास होता. त्या अर्थी ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.

- Advertisement -

तांबट सर मला सहावीला शिक्षक होते. वार्षिक परीक्षेच्या वेळेस मी आजारी पडलो. शेवटचा पेपर देत असताना मी चक्कर येऊन पडलो. सरांनी मला मला घरी आणून सोडले. मला नंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. मी जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये होतो तोपर्यंत सर रोज मला बघण्याकरता हॉस्पिटलमध्ये येत होते.

ती ओळख सरांनी तशीच जपून ठेवली आणि मी रुजू व्हायला पेठे विद्यालय गेलो तेव्हा ती आठवणीने दिली. सरांच्या श्वासात ओतप्रोत विद्यार्थी भरलेला असे. पेठे विद्यालयात नोकरीस लागल्याने नंतर सरांबरोबर अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली. सरांचे बरोबर काम करत असताना सर कायम एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत असले तरी ते मित्रत्वाने वागत. सर माझे शिक्षक होते नंतर सहकारी झाले आणि एक चांगले मित्रही झाले.

सरांचे लहानपण नवीन तांबट गल्लीत गेले. घरची सामान्य परिस्थिती होती. शिक्षण सर्व रुंगठा विद्यालयात झाले. सर आपल्याला एक वादक म्हणून संगीतकार म्हणून शिक्षक म्हणून दिसतात पण सर एक उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू होते. मल्लखांबाची अनेक पारितोषिके त्यांनी रुंगठा विद्यालयास मिळवून दिलेली होती.

सरांचा विषय हस्तकला व चित्रकला होता. पण संगीताची आवड असल्याने सर संगीतातही काम करू लागले होते. संगीतकार बाळ भाटे अनंत केळकर हे ज्येष्ठ शिक्षक असले तरी सर त्यांच्याबरोबर संगीतात काम करू लागले. सर जे काम करणार ते जीव ओतून करणार, स्वतःहून करणार आणि त्याला खास स्वतःचा टच देणार.

विद्यालयाचा कुठलाही कार्यक्रम असला तर सर स्वतःहून त्यात काम करणार. कार्यक्रम यशस्वी झाला त्याचे श्रेय सर्वांना देमार. मी नाही आम्ही सर्वांनी केले असे ते सांगणार. हे त्यांचे खरे मोठेपण होते. ते त्यांनी सेवानिवृत्ती पर्यंत जपले होते.

सर संस्था राजकारणात राहिले पण त्यांना राजकीय शत्रू कधी झाला नाही. त्यांचे कोणाबरोबर मतभेद झाले असतील पण त्यांनी मनभेद कधी होऊ दिला नाही. संस्थेच्या शिक्षक मंडळाच्या निवडणुकीत ते उमेदवार म्हणून उभे राहिले. निवडणुकीचा प्रचार वेगळ्या पद्धतीने केला. सर प्रत्येक शिक्षकाच्या घरी गेले गप्पा मारल्या आणि परत आले. त्यांच्या विरोधात उभे होते त्यांच्याही घरी सर गेले. सरांनी निवडणुकीत यशश्री खेचून आणली.

पेठे विद्यालय नाशिक चे सांस्कृतिक केंद्र होते. लोकहितवादी मंडळाचे कार्यक्रम व सराव शाळेत होत असे. स्व. तात्यासाहेब शिरवाडकर स्व. वसंतराव कानेटकर त्यावेळेस उपस्थित राहत. सर या सर्व कार्यक्रमात हिरारीने सहभागी होत असत. ते उत्कृष्ट तबला,कोंगो, नाल वादक होते. सार्वजनिक कार्यक्रमात ते सदैव सहभागी होत. हृदयनाथ मंगेशकर,बाबूजी फडके, यशवंत देव अशा दिग्गजांना त्यांनी संगीताची साथ केली होती. संगीत कार्यक्रमाकरिता त्यांनी परदेशवारी पण केली होती. त्यांचा स्वतःचा स्वरदा सुगम संगीत वर्ग होता. त्या माध्यमातून ते नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत होते. संगीत क्षेत्रात नवनवीन कलाकारांच्या उदय करण्याचे मोठे काम सरांनी केले होते.

त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक मानाचे पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. नुकताच त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कारही प्राप्त झाला होता. एन डीएसटी सोसायटी, लायनेस क्लब या संस्थांनीही संगीत क्षेत्रातील योगदान बद्दल पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. सरांना मात्र नाशिकचे जनस्थान वाॅटस् अप ग्रुपचा पुरस्कार आनंददायी वाटत होता.

सरांची ओळख नवीन तांबट म्हणून जरी असली तरी सरांचे नाव नवीनचंद्र असे होते. त्यांचा जन्म नारळी पौर्णिमेचा म्हणून त्यांचे नाव नवीनचंद्र असे ठेवले होते. नावात मिळालेला चंद्र ओळखीत जरी राहिला नाही तरी त्यांच्या वागण्यातून तो प्रतिबिंबित होत असे. चंद्राच्या शीतलते प्रमाणे त्यांचे वागणे बोलणे होते. सर अत्यंत शांत चिडणे रागावणे त्यांना अवगत नव्हते. त्यांचे नावाप्रमाणे ते सदैव संगीतात नवनवीन प्रयोग करण्यात मग्न असत.

अत्यंत शांत मनमिळावू व सदैव हसतमुख असलेले सर आज आपल्यात नाही. सर्वांना ते सदैव हवेहवेसे वाटत असत. आजही ही सर आपल्यात अजून असायला हवे होते असेच सर्वांना वाटते. सरांची उणीव सदैव जाणवत राहील. मी एक चांगला मार्गदर्शक व मित्र गमावला आहे. सरांचा परलोकाचा प्रवाहही संगीतमय असेल. तो सुरमय होत त्यांना सद्गति मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

सर अलविदा….

शरद जाधव, 942-276-1699

- Advertisment -

ताज्या बातम्या