नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) नाकाखाली काय चालले आहे, याचा पत्ता स्थानिक यंत्रणेला नसतो की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. निमित्त आहे, मुंबई एसीबीने नाशिकमध्ये (Nashik) येऊन सलग दुसऱ्यांदा केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सिडकोतील दामोदर चौकात जीएसटीच्या दोन बड्या अधिकाऱ्यांसाठी २० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पंटरला अटक करून मुंबई पथकाने नाशिक एसीबीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील वस्तू व सेवाकर (जीएसटी) कार्यालयातील राज्यकर उपायुक्त संशयित सोमनाथ दत्तू पागे आणि सहायक राज्यकर आयुक्त संशयित मच्छिंद्र विठ्ठल दोंदे या दोन बड्या माशांनी एका व्यावसायिकाला जीएसटी चौकशीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ कोटी रुपये ठरले. यातील पहिला हप्ता २० लाख रुपये स्वीकारताना त्यांचा खासगी पंटर अमित हिरामण जाधव याला मुंबई एसीबीने रंगेहाथ बेड्या ठोकल्या. या संपूर्ण कारवाईतील सर्वात धक्कादायक आणि सूचक बाब म्हणजे, तक्रारदाराने नाशिकमध्ये राहूनही स्थानिक मुंबई गाठली.
गेल्या महिनाभरात मुंबई एसीबीने (ACB) नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) केलेली ही दुसरी कारवाई आहे. जेव्हा तक्रारदार स्थानिक विभागावर विश्वास न ठेवता शेकडो किलोमीटर लांब असलेल्या मुंबई कार्यालयाची पायरी चढतात, तेव्हा नाशिक एसीबीच्या गोपनीयतेवर आणि ‘सेटिंग’च्या चर्चेवर शिक्कामोर्तब होत आहे, अशी चर्चा आहे. मुंबईच्या दणक्याने नाशिकमधील भ्रष्टाचार उघड होत असताना, स्थानिक एसीबीने मात्र आपल्या प्रतिमेचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, ‘नाशिकचा पत्ता, पण मुंबईचा छापा’ हे समीकरण रूढ होण्याचे चान्सेस आहेत.
पोस्टमनची भूमिका?
मुंबई एसीबीचे सहायक आयुक्त विजय शंकर चव्हाण यांचे पथक नाशिकमध्ये येते, सापळा रचते, संशयितांना पकडते आणि त्यानंतर पुढील औपचारिकतेसाठी कार्यवाही नाशिक एसीबीकडे सोपवते. अशावेळी नाशिक एसीबी केवळ ‘पोस्टमन’ किंवा कागदपत्रे हलवणारी यंत्रणा उरली आहे का? अशी टीका होत आहे. विशेष म्हणजे, ट्रॅप यशस्वी झाल्यानंतर संशयितांच्या घरझडतीचा तपशील, जप्त केलेली मालमत्ता आणि गुन्ह्याची महत्त्वाची माहिती प्रसार माध्यमांना देण्यास नाशिक एसीबीकडून टाळाटाळ केली जात असल्याचे समजते.
पागेच्या कार्यालयात लक्ष्मी प्रसन्न
सापळा कारवाईनंतर पागे याच्या कार्यालयाची झडती घेतली असता तेथे २ लाख रुपयांची रोकड मिळून आली. संशयितांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या दुचाकी, कार आणि इतर मौल्यवान ऐवजीबाबत नाशिक एसीबीने अद्याप अधिकृत आणि ठोस माहिती दिलेली नाही. माहिती देण्याबाबतची ही ‘नाकमुरड’ वृत्तीच नाशिक एसीबीला संशयाच्या भोवऱ्यात उभी करत आहे.




