नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शेअर मार्केटमध्ये (Share Market) आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) एका व्यावसायिकाकडून तब्बल ९४ लाख रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे गुंतविलेले १७ लाख रुपये परत मिळविण्यासाठी व्यावसायिकाने (Professional) प्रयत्न केला असता, त्यासाठी विविध टॅक्सच्या नावाखाली आणखी ७७ लाख रुपये घेत ही फसवणूक करण्यात आली. याबाबत शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शहरात वास्तव्यास असलेल्या एका तक्रारदारास सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअप क्रमांक ४४७८८१४६८८३९, ४४७३८६७७१०१५ आणि ४४७७९८७०५७७७ वरुन संपर्क साधला. त्यात त्यांना शेअर मार्केटसंबंधी माहिती दिली. यावेळी संशयितांनी तक्रारदारास ‘ऑनलाईन फौरेक्स ब्रोकर’ असल्याचे भासवले. ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडींगच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. संशयितांच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने व इतर नागरिकांना गुंतवणूकीवर जादा परतावा मिळाल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी तयारी दर्शवली.
त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत १७ लाख १२ हजार रुपये गुंतवले.मात्र, अनेक दिवस उलटूनही परतावा मिळण्यास अडचण येऊ लागली. त्यामुळे त्यांनी गुंतवलेले १७ लाख रुपये काढण्यासाठी प्रयत्न केले.तेव्हा संशयितांनी त्यांना विविध कारणे सांगितली. पैसे परत पाहिजे असतील तर त्यावर टॅक्स भरुन अन्य फॉर्मेलिटी करण्यास भाग पाडले. त्यानुसार, त्यांनी १७ लाख रुपयांपोटी टॅक्स स्वरुपात ७७ लाख रुपये भरले. मात्र, पैसे व परतावा मिळाला नाही. एकूण ९२ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने पोलीस ठाणे (Police Station) गाठून तक्रार दिली. तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.