Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमNashik Crime : नायलॉन मांजा विक्री-वापर करणाऱ्यांसह पालकांवरही गुन्हा

Nashik Crime : नायलॉन मांजा विक्री-वापर करणाऱ्यांसह पालकांवरही गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणारे तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्यांना शोधून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik Police Commissionerate) हद्दीत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबाबत १३ गुन्हे दाखल करण्यात आले.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत नायलॉन मांजापासून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण व्हावे तसेच नायलॉन मांजाच्या वापरामुळे अपघाताच्या प्रमाणांना प्रतिबंध व्हावा याकरता तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरता नायलॉन मांजा व ज्या मांजावर काचेची धारधार व टोकदार कोटिंग केलेली आहे अशा मांजाची विक्री, खरेदी, वापर, साठा आदींवर प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मनाई आदेश लागू करून नायलॉन मांजा वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

असे असतानाही नायलॉन मांजा विक्री करणारे तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवून या मोहिमेदरम्यान आडगाव-१, पंचवटी-३, मुंबईनाका-१, सातपूर १, अंबड-३, इंदिरानगर-२, नाशिकरोड-२ असे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबाबत १३ गुन्हे दाखल करण्यात आले. सोमवारी (दि. १३) दाखल १३ गुन्ह्यांमध्ये एकूण २१ जणांपैकी सहा विधीसंघर्षित बालक व त्यांचे चार पालक आहेत.

सदर दाखल गुन्ह्यात (Case) १ लाख ८६ हजार १५० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे १३३ गड्डू जप्त करण्यात आले. दाखल गुन्ह्यातील २१ जणांपैकी सहा विधीसंघर्षित बालक, त्यांच्या चार पालकांना तसेच इतर ११ जण असे एकूण १५ जणांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर अटक केलेल्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन जणांना दोन दिवस पोलीस कोठडी व इतर १२ जणांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.

रविवारी (दि. १२) आडगाव पोलीस ठाणे (Adgaon Police Station) येथे नायलॉन मांजासंदर्भात दाखल गुन्ह्यातील एका पालकास अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. नोव्हेंबर २०२४ ते १३ जानेवारीपर्यंत ८४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्यात १२ लाख १० हजार ९०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे एकूण १,३२७ गड्डू जप्त करण्यात आले आहेत.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मनुष्य व वन्यपक्षी यांच्या जीवितास तसेच पर्यावरणास धोकादायक असलेला नायलॉन मांजाचा वापर करू नये. मनाई आदेशाचे उल्लंघन करून नायलॉन मांजाची विक्री, खरेदी, साठा करणारे तसेच नायलॉन मांजा खरेदी करून पतंग उडवणाऱ्यांचा शोध घेवून कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अल्पवयीन मुले नायलॉन मांजाची खरेदी करून पतंग उडवणार नाहीत याबाबत पालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या