नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर (Sarkarwada Police Station) विधिसंघर्षित मुलांच्या दोन गटांत तुफान राडा घडल्याची घटना स्वातंत्र्यदिनी (दि. १५) घडली. याबाबत एका गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार दुसऱ्या गटातील विधिसंघर्षितांविरोधात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, काही स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात दहशत व गुंडगिरी पोसण्यासाठी अल्पवयीन मुलांना हाताशी धरल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
पेठरोडवरील आरटीओ ऑफिसमोर (RTO Office) असलेल्या अनुसया नगरात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता तो व त्याते दोन मित्र सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोरील मराठा विद्यालयाजवळ असताना त्यांच्या एका मित्राच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने ते देण्यासाठी जात होते.तेव्हा दुसऱ्या गटातील सात संशयित आले व त्यांनी फिर्यादी मुलाच्या (Boy) मित्राशी वाद घालून ‘इन्स्टाग्रामवर रिल्स व व्हिडीओ अपलोड का केले’, याची कुरापत काढून मारहाण सुरु केली.
या धाकातून तो पळून गेला, मात्र त्याचवेळी फिर्यादी मुलगा व त्याचा मित्र तिथेच थांबून असल्याने, संशयित मुलांनी त्यांच्याशी कुरापत काढून ‘हे पण त्यांच्यातलेच आहेत’, असे म्हणून धारदार चॉपरने वार केले. या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर पंचवटीतील खासगी रुग्णालयांत (Private Hospital) उपचार सुरु आहेत. याबाबत उपनिरीक्षक संज्योग टीपरे तपास करत आहेत. काही संशयित मुले ताब्यात असून त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. दरम्यान, आपापसातील वाद तसेच प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले आहे.
पंचवटीत टोळके सुसाट
आरटीओ कॉर्नर, फुलेनगर, हनुमानवाडी, मधुबन कॉलनी, हिरावाडी, त्रिमूर्तीनगर, नवनाथनगर, कर्णनगर, ड्रीम कॅसल, सप्तरंग परिसर आदी भागांत सराईतांसह त्यांच्या टोळीत विधिसंघर्षितांचा भरणा वाढत आहेत. हिच अल्पवयीन मुले गंभीर गुन्ह्यांत सहभागी होत असून विविध चौक व कॉलनी परिसरात दररोज हैदोस घालत आहेत.
हत्येत सहभाग!
वाढदिवसानिमित्त ‘केक कटिंग’ कार्यक्रमात १७ वर्षीय मुलाने केक भरविल्याच्या वादातून मित्राच्या कानशिलात लगावल्याने तो राग धरुन विधिसंघर्षित संशयिताने साथीदारांच्या मदतीने आशिष दशरथ रणमाळे (वय १७, रा. सार्वजनिक वाचनालयाजवळ, कर्णनगर) याचा मे २०२४ मध्ये खून केला होता. पंचवटीतील आरटीओ ऑफिससमोरील कर्णनगर (अश्वमेघ) येथे ही घटना घडली होती. मारेकऱ्यांत तिघा विधिसंघर्षित मुलांचा सहभाग होता. त्यातीलच एक ते दोन विधिसंघर्षितांचा स्वातंत्र्यदिनी सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर घडलेल्या हल्ला प्रकरणात सहभाग आढळल्याचे समजते.




