सिन्नर | वार्ताहर | Sinnar
सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील रस्त्यावर (Sinnar-Shirdi Road) वावी वेसी जवळील दोस्ती ट्रेडर्स या स्टीलच्या दुकानात आय ट्वेन्टी या चार चाकी कार मधून आलेल्या चौघांपैकी तिघांनी दुकानाचे (Shop) संचालक सागर नामदेव लोंढे (वय २८) यांच्यावर दुकानात शिरून कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज दुपारी दोनच्या दरम्यान घडली. त्यात सागर यांच्या पाठीवर, डाव्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार (Attack) केल्याने ते जखमी झाले आहेत. त्यादरम्यान गाडीत थांबून असलेल्या एकाने हवेत गोळीबार केल्याने आजूबाजूचे लोक आवाजाच्या दिशेने पळत दुकानाकडे आले. त्याचा फायदा घेत तिघे कारमध्ये जाऊन बसले आणि कार वेगाने नांदूर शिंगोटेकडे निघून गेली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) नांदूर शिंगोटे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी सिन्नर संगमनेर रस्त्यावर नाकाबंदी केली. नांदूर शिंगोटे जवळ पोलिसांची नाकाबंदी बघताच चौघांनी गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात गाडी दुभाजकावर जाऊन आदळली व त्यातच अडकली. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या एकाची मोटरसायकल घेत तिघे मोटरसायकलवर निमोनच्या रस्त्याने फरार झाले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी या कारची तपासणी केली असता कार मध्ये गावठी कट्टा आढळून आला आहे. तसेच जखमी सागरला तातडीने आजूबाजूच्या दुकानदारांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला नाशिक येथे खाजगी रुग्णालयात (Private Hospital) हलवण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. दुकानाच्या बाहेर व दुकानाच्या आत असलेला रक्ताचा सडा पाहून पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानपथक व ठसे तज्ञ घटनास्थळी पोहोचले असून दोस्ती ट्रेडर्सच्या बाजूलाच चार चाकी गाड्यांची बॉडी बनवण्याचे काम चालते. त्याचे उभे असलेल्या नव्या गाडीवरही रक्ताचे थेंब पडल्याचे पोलिसांना दिसून आले. कार चोरीची आहे की तिचा कोणी मालक आहे? याची माहिती अजून निष्पन्न झालेली नाही.