नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात (Nashik City) खुनासह गोळीबाराच्या (Firing) घटना घडत आहेत. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. अशातच आता पुन्हा एकदा नाशिकमधील जय भवानीरोड (Jay Bhavani Road) येथे खुनाची (Murder) घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जय भवानीरोड येथील साबरमती सोसायटीतील अमोल मेश्राम (वय ४३) नामक व्यक्तीचा आज (मंगळवार) पहाटे खून करण्यात आला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या मंदिरात मेश्राम दर्शनासाठी गेला होता. मात्र, यावेळी अंधाराचा फायदा बघून काही अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात अमोल रस्त्यावर पडल होता.
दरम्यान, मुलगा (Son) घरी आला नाही म्हणून आई शोधण्यासाठी गेली असता तिला अमोल जखमी अवस्थेत दिसला. यावेळी तिने हंबरडा फोडला. त्यानंतर पुढील उपचारासाठी मेश्राम याला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. हल्लेखोर कोण आहे? हल्ला कशामुळे झाला याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस (Upnagar Police) संबंधित हल्लेखोरांचा तपास करत आहेत.




