पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
पंचवटीतील हिरावाडी (Hirawadi) येथील नेहा संतोष पवार (वय २७) या नवविवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तसेच चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणावरून टोकाचा निर्णय घेत आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी पतीसह सासू व तीन नणंदांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वरनगर, हिरावाडी येथे राहणाऱ्या नेहा पवार हिने बुधवारी (दि. २६) रोजी दुपारी टेलफॉस हे विषारी औषध सेवन केले. आत्महत्येपूर्वी तिने विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यांत सासरकडून झालेल्या छळाची सविस्तर माहिती सहा फुलस्केप पानांवर लिहून ठेवली होती. या चिठ्ठ्यांचे फोटो तिने भावाला व्हॉट्सअॅपवर पाठवत, “व्हॉट्सअॅप पहा” असे सांगितले होते.
हे देखील वाचा : Nashik Crime : रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा…; पंचवटीत सुसाईड नाेट लिहून नवविवाहितेची आत्महत्या
विषप्राशनानंतर तिची प्रकृती बिघडल्याने नणंदेच्या मुलाने भावाला खबर दिली. मात्र, यावेळी सासरच्या कोणालाही तिला उपचारासाठी (Treatment) घेऊन जाण्याची इच्छाही नव्हती, अशी फिर्यादीत नमूद आहे. भावाने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी चिठ्ठीसह इतर साहित्य ताब्यात घेऊन तपास सुरू केला. नेहाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष पंडित पवार, सासू व तिन्ही नणंदांविरुद्ध हुंड्यासाठी छळ, मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कठोर शासन करा
नेहाने विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यानंतर विषप्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी अक्षरशः अंगावर शहारे आणणारी होती. संतप्त नातेवाईक आज (दि.२७) रोजी सकाळी पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते. यात महिलांचा सहभाग अधिक दिसून आला. यावेळी महिलांना भावना अनावर झाल्या अन् त्या म्हणाल्या की, आरोपींना कठोर शिक्षा द्या… यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक झाल्याचे सांगितल्यानंतर नातेवाईंकाचा राग शांत झाला.
नेहा पवार हिचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे तपासात व मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे. शारीरिक व मानसिक छळ, औषधोपचार न करणे, माहेराहून पैसे आणावे यासाठी टोमणे मारणे, माहेरचे नातेवाईक मयत झाल्यानंतर जाऊ न देणे, चारित्र्यावर संशय यास कंटाळून नेहा हिने विषारी औषध प्राशन केले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल तसेच भावाच्या तक्रारीन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसह पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. विनाविलंब गुन्हा दाखल केला असून, लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल.
सुनील पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंचवटी पोलीस ठाणे.




