पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात (Hanumanwadi Area) रविवारी रात्री सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर आणि त्याच्या टोळीने दहशत माजवत एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. “तू पोलिसांना आमची खबर देतो,” असा संशय घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या दिशेने कोयते भिरकावले. सुदैवाने फिर्यादी थोडक्यात बचावले, मात्र संतापलेल्या टोळीने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत परिसरात मोठी दहशत निर्माण केली.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश नंदू रणमाळे (२९, रा. हनुमानवाडी) हे रविवारी (दि. १५) रात्री उशिरा जेवण करून आपल्या मित्रांसोबत घराशेजारील हनुमान मंदिराजवळ गप्पा मारत उभे होते. यावेळी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर, मयुर निकम, श्रावण पगारे, रुपेश ताजणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या ४ ते ५ अनोळखी इसमांनी तेथे धाव घेतली.
कोयत्याने हल्ला अन् वाहनांची तोडफोड
यावेळी “तू पोलिसांचा खबऱ्या आहेस,” असे म्हणत आरोपींनी निलेश यांच्यावर धारदार कोयते (Koyta) फेकून मारले. हा हल्ला वर्मी लागला असता तर निलेश यांचा जागीच मृत्यू झाला असता, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला. निलेश हातातून निसटल्याने संतप्त झालेल्या पाटणकर टोळीने परिसरात उभी असलेली दुचाकी तसेच रस्त्यावरील इतर चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchvati Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक निरीक्षक सतिष शिरसाठ आणि उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हर्षद पाटणकर व त्याच्या टोळीविरुद्ध खुनाचा (Murder) प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.




