Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : अवघ्या बारा दिवसांत पैसे दुप्पट करण्याचं दाखवलं आमिष; केली...

Nashik Crime : अवघ्या बारा दिवसांत पैसे दुप्पट करण्याचं दाखवलं आमिष; केली कोट्यवधींची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मल्टिलेव्हल मार्केटिंगसाठी (एमएलएम) नाशिक हे डेस्टिनेशन ठरवून तथाकथित स्थानिक गुंतवणूक सल्लागारांनी (Investment Advisors) अवघ्या बारा दिवसांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून भारतभरातील दहा हजारांहून अधिक गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची (Scam) व्याप्ती ५ कोटी रुपयांहून अधिकची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे गुंतवणूकदारांकडून फक्त प्रोसेसिंगच्या नावाखाली पाच संशयितांनी (Suspected) एक कोटी रुपये उकळले असून शहर सायबर पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करुन गुन्हा दाखल करत तिघांना अटक (Arrested) केली आहे. इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. विकी शिंदे (वय ३१, रा. मालेगाव), संदीप मत्साळकर (इंदिरानगर, नाशिक), विष्णू मुरलीधर पाटील (वय ५०, रा., माले-गाव कॅम्प), प्रमोद क्षत्रिय, (वय ४१, रा. राधे रो-हाउस, राजसारथीमागे, इंदिरानगर,) व चेतन संजय महाजन, (वय ३६, रा., मु. पो. लोहोणेर ता. देवळा जि. नाशिक) अशी संशयितांची नावे असून विष्णू पाटील, प्रमोद बिल्लाडे व चेतन महाजन यांना अटक करण्यात आली आहे.

YouTube video player

यातील पाटील हा भाजीपाला विक्री करतो तर बिल्लाडे हा गुंतवणूक सल्लागार आहे. इतर संशयित एमएलएमशी निगडीत असून लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी ते २४ तासांतील ६ तास मोबाईलवरच घालवत असल्याचे उघड होत आहे. शहरात यापूर्वीच सायबर नेक्ससमधून सुरु असलेले बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले हो-ते. त्यातच दिवसाआड विविध स्वरुपाच्या फसवणुकांचे (Fraud) सायबर गुन्हे नोंद होत असून आता मल्टिलेव्हल मार्केटिंगचा काहीसा अनुभव असल्याच्या जोरावर जिल्ह्यातील पाच जणांनी हा स्कॅम केला आहे. गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी ही कारवाई केली. तर गुन्ह्याची व्याप्ती भारतभर पसरली असून आता तक्रारदार समोर आल्यावरच कोट्यवधींच्या फसवणुकीचा नेमका आकडा उघड होणार आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे (Cyber Police Station) अमलदार प्रतिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी संगनमत करुन ‘ओपेन हॅन्डस’ ही वेबसाईट तयार केली. त्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागांची परवानगी न घेता व नोंद न करता एमएलएमचे काम सुरु केले. याच माध्यमातून गुंतवणुकदारांवर ऑनलाइन अॅपमार्फत संपर्क करुन आकर्षक परतावा तसेच गुंतवणुकीच्या नानाविध योजनांचा भडिमार केला. त्यानुसार, गुंतवणुकदारांना बारा ते पंधरा दिवसांत गुंतविलेली रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हजारो नागरिकांनी १० हजारांपासून पाच ते आठ लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकांना त्यातून दुप्पट पैसे मिळाले देखिल आहेत. मात्र, कोणत्याही परवानगीशिवाय आर्थिक गुंतवणुकीचा पसारा मांडल्याचे दिसताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

झूम मिटिंग अन् हॉटेलांत सेमिनार

आपल्या एमएलए स्कीममध्ये जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणूक करावी, यासाठी संशयितांनी स्वतःची एक बनावट कंपनी उभारल्याचे उघड होत असून, त्याच बॅनरखाली नागरिकांना ऑनलाइन झूम मिटिंगमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. तसेच नाशिक, पुणे, यूपीसह बहराईच, नागपूर, ठाणे, विरार, हडपसर व अन्य शहर व जिल्ह्यांत सेमिनार व वेबिनार घेतले आहेत. यात प्राथमिक तपासानुसार, दहा हजार नागरिकांना गुंतवणुकीसाठी एक हजार रुपयांच्या पिनसह टास्कची विक्री करण्यास सांगून गैरव्यवहार केले आहेत. या व्यवहारातून जमलेली एक कोटी रुपयांची रक्कम उकळून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • दुप्पट पैशांच्या आमिषाने अनेकांकडून १० हजारांची गुंतवणूक
  • अनेकांना २० हजार रुपयेही मिळाले
  • हव्यासाने गुंतवणूक वाढली
  • योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, परवानगी नाही
  • फसवणूक, एमपीआयडीसह आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा
  • फसवणुकीत परप्रांतीय नागरिकांची संख्या जास्त
  • कोट सूट परिधान करुन तारांकित हॉटेलांत गुंतवणुकदारांशी संवाद
  • संशयितांची वाहने, कार्यालय, संगणक, मोबाईलवर गंडांतर

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...