नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ज्या कांद्याने आजवर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले, त्याच कांद्याच्या नावाखाली नाशिकमध्ये (Nashik) एका व्यापाऱ्याला अक्षरशः रडवल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांकडून (Farmer) स्वस्त दरात उच्च प्रतीचा कांदा मिळवून देतो असे आमिष दाखवून साई सन्मान फार्म प्रोड्युसर लि. कंपनीच्या पाच संचालकांनी एका व्यापाऱ्याचा तब्बल ४९ लाख ५० हजार रुपयांचा विश्वासघात केला आहे. या हायप्रोफाईल फसवणुकीने नाशिकच्या कृषी व्यापार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी संदीप मधुकर दिघे या व्यापाऱ्याला संशयित मुकेश दराडे आणि त्याच्या साथीदारांनी जाळ्यात ओढले. फिर्यादीला दत्तमंदिर सिग्नलजवळ गाठून, कंपनीवर कर्ज (Loan) घेण्यासाठी खात्यावर मोठे व्यवहार दाखवण्याचे सांगितले. व्यापाऱ्याने विश्वासाने दिलेले पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी संशयितांनी वैयक्तिक फायद्यासाठी वापरले. फसवणुकीचा हा प्रकार उघड होऊ नये म्हणून संशयित मुकेश दराडे याने बनावट बिले तयार केली.
दरम्यान, ही खोटी बिले व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फिर्यादीला पाठवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला गेला. शेतकऱ्यांच्या नावाने कंपनी स्थापन करून प्रत्यक्षात व्यापाऱ्यांची लूट करणारी ही पाच जणांची टोळी आता पोलिसांच्या (Police) जाळ्यात अडकली आहे. यात संशयित मुकेश दराडे, अर्चना दराडे, गोरक्षनाथ बरके, शेखर पवार आणि गणेश गिद यांचा सहभाग उघड होत असून फसवणुकीचा (Fraud) आकडा ४९ लाख ५० हजार इतका आहे. उपनगर पोलीस तपास करत आहेत.
फसवणुकांचे केंद्र?
शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या ‘फार्मर प्रोड्युसर कंपन्या’ आता फसवणुकीचे केंद्र बनत आहेत का ? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांना स्वस्त माल देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले जातात आणि प्रत्यक्षात माल न देता पैशांचा अपहार केला जातो. नाशिक पोलिसांनी या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्धार केला आहे.




