नाशिक | प्रतिनिधी | Nashik
म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील (Mhasrul-Aadgaon Link Road) ‘कॅटल हाऊस’ मल्टिकुझीन रेस्ट्रो व हुक्का पार्लरवर पोलिसांनी (Police) दोनदा छापा (Raid) टाकून कारवाई केली असतानाच आता या पार्लरचा चालक व रिटायर्ड डीवायएसपी संजय देशमुख यांचा मुलगा संशयित सौरभ याने जबरदस्त उन्मत्तपणा केल्याचे २७ मे रोजी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारातून समोर आले आहे.
गंगापूररोडवरील (Gangapur Road) एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलात डांबून ठेवत पिस्तुलाचा धाक दाखवून दोघींकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अनैतिक व्यवसाय करण्यास सांगितल्याचे दाखल फिर्यादीतून समोर आले आहे. याप्रकरणी सौरभसह हॉटेलातील वेटर मोहित मिलिंद ताम्हाणे यांच्याविरुद्ध विनयभंग, दरोडा, डांबून ठेवण्यासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार घडून चार महिने झाले असून फोटोग्राफर पीडितेने भीतीपोटी तक्रार केली नव्हती. दरम्यान, दोघांनाही अटक झाली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
म्हसरूळ लिंकरोडवरील ‘कॅटल हाऊस’ हॉटेल (Cattle House) गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अवैध मद्यविक्री, प्राशन, हुक्का पार्लरमुळे चर्चेत आहे. हॉटेलात बेकायदेशीर ‘कृत्ये व दृष्कृत्ये’ सुरू असल्याने अनेकदा पोलिसांनी छापा टाकून गुन्हेही दाखल केले आहेत. असे असताना सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक तथा उपअधीक्षक संजय देशमुख यांचा ‘आशीर्वाद’ असल्यानेच कारवाईनंतर हटिलातील उद्योग काही दिवसांतच पूर्ववत होत असल्याच दावा काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे दुसरा अध्याय म्हणून देशमुखांच्या ‘व्हाईट कॉलर’ पुत्राने आता थेट पिस्तुलाच्या धाकावर दोन तरुणींसह त्यांच्या मित्रास आर्थिक वादाच्या कुरापतीतून डांबून ठेवत अश्लील वर्तन केले व त्यांच्या पर्ससह बॉलेटमधील एकूण एकवीस हजार रुपयांवर दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे.
तरुणीच्या फिर्यादीनुसार…
तिच्यासह मैत्रीण व मित्र तन्मय पिसोळकर (रा. शिवाजीनगर) यांचा पूर्वाश्रमीचा ‘जॉबलेस’ मित्र मोहित ताह्माणे याने सन २०२० पासून अनेकदा त्यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. मोहित सापडत नसतानाच २७ मे रोजी तो कॅटल हाऊसमध्ये बेटर असल्याची माहिती पीडितेसह पिसोळकरला मिळाली. तेव्हा पीडिता व तिचे मित्र-मैत्रिण स्कोडा गाडीने रात्री साडेआठ वाजता हॉटेलात गेले. तेव्हा मोहित दिसताच तिघांनीही पैशांची मागणी केली. तेव्हा पीडितेच्या ओळखीचा व हॉटेलचालक सौरभ देशमुख आला. पैसे मागण्याचा वाद सुरू असतानाच सौरभने तिघांना शिवीगाळ करून ‘तुम्ही येथे आलेच कशाला, येऊन खूप मोठी चूक केली, माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स मुली पुरवल्या जातात, तुम्ही दोधी कॉलगर्ल्स म्हणून काम करा, पैसे देईन, मोहितकडून पैसे मागण्याची गरज भासणार नाही’ असे शब्द उच्चारले.
तिघांनी काढता पाय घेतला असता सौरभने तिघांवर पिस्तूल रोखली व शरीरसुखाची मागणी करत बाजूलाच डांबून ठेवून बाहेर जाण्यास मज्जाव केला. तिघांनी विनंती केली असताही सौरभने ‘माझा बाप रिटायर्ड डीवायएसपी आहे, अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे, जर पोलीस ठाण्याला (Police Station) तक्रार केली तर तक्रार नोंद होणार नाही असे म्हणून नंतर मोहितनेदेखील पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली व पिस्तुलाचा धाक दाखवून ‘पैसे द्या नाहीतर तुम्हाला येथेच ठोकून टाकतो’ अशी ठार मारण्याची धमकी दिली असता मोहितने तिघांचे पर्स व वॉलेट हिसकावून २१ हजार रुपये काढून घेतले, त्यानंतर धमकी देऊन पहाटे साडेपाच वाजता तिघांची सुटका केली. तिघे प्रचंड तणावात व घाबरले असल्याने त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, मोहितने व्हॉटस्अॅपवरून धमकीचे मेसेज पाठवल्याने तिघांनी एकजूट करून २६ सप्टेंबर २०२५ रोजी म्हसरूळ पोलिसांत (Mhasrul Police) फिर्याद नोंदवली आहे.
ठळक मुद्दे
- सौरभ व मोहित गजाआड, तीन दिवसांची कोठडी
- कॅटल हाऊसमध्ये सन २०२३ मध्ये जून व ऑक्टोबरमध्ये पोलिसांचा छापा
- महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे यापूर्वी नोंद
- हे हॉटेल रहिवासी वस्तीपासून निर्जन स्थळासह शेतात
- हुक्का पार्लर चालवताना छाप्यापासून लपण्यासाठी उपाययोजना
- सौरभ व वेटरांकडून वॉकीटॉकीचा वापर
- छापे टाकूनही हुक्क्याचा धंदा लगेचच पूर्ववत
- आत थेट दरोडा, विनयभंगासह गंभीर कलमान्वये गुन्हा
- पिस्तूल परवानाधारक की बेकायदेशीर याचा तपास





