नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एमडी ड्रग्जचे (MD Drugs) नवे नेटवर्क पुणेमार्गे नाशकात सुरु झाल्याचे नाशिक शहर (Nashik City) एनडीपीएस पथकाच्या कारवाईतून समोर आले आहे. त्यातच जेमतेम शिक्षण केलेले चौघे संशयित चक्क दोन ते अडीच हजार रुपये प्रति ग्रॅमने या ड्रग्जची ठराविक आणि ओळखीतीलच युवावर्गाला विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले असून एमडीसाठी जशी मागणी तसा पुरवठा करण्यात तिघा संशयितांची (Suspected) साखळी तरबेज झाली होती. दरम्यान, अटकेतील सर्व ड्रग्ज पेडलरच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे.
नाशकात पुन्हा एकदा एमडी ड्रग्जचे नवे कार्टेल उघड झाले आहे. पंचवटीतील (Panchvati) तलाठी कॉलनीत राहणाऱ्या आकर्षण श्रीश्रीमाळ याच्याकडून अजय रायकर हा एमडी पावडरची खरेदी करीत होता. वर्षभरापूर्वी आकर्षणकडून घेतलेली एमडी अजयने विक्री करण्यास सुरुवात केली. त्यातून जास्तीचे पैसे मिळण्यास सुरुवात केल्यावर दोघांनी विक्री वाढवली. पुण्यातील आळेफाट्यावरून नाशिकमध्ये एमडी विक्रीसाठी आणले जात होते. जितकी मागणी असेल, तितकेच एमडी ते खरेदी करुन पुरवठा करत होते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अमली पदार्थविरुद्ध कारवाईत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनडीपीएस) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार (दि. ६) पहाटे अशोका मार्गावर सापळा रचण्यात आला. दोन लाख ९७ हजार पाचशे रुपयांचे एमडी बाळगणाऱ्या तिघांना पथकाने ताब्यात घेतले. अजय भिका रायकर (वय ३६), मोसिन हानिफ शेख (३६) व अल्ताफ पीरन शहा (३५, तिघे रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यापैकी अजय याला एमडी पुरविणारा संशयित आकर्षण रमेश श्रीश्रीमाळ (३०, भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट, तलाठी कॉलनी, पंचवटी) यालाही अटक झाली. हे चौघेही सध्या पोलिस कोठडीत (Police Custody) असून, त्यांनी काही महिन्यांपूर्वीच एमडी तस्करीसह विक्रीचा उद्योग सुरु केला होता. हे तिघेही अनेक वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर होते. या टोळीने अतिशय जाणीवपूर्वक एमडी तस्करी केली असेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पथक पुण्याला जाणार!
पंचवटीतील आकर्षण श्रीश्रीमाळ हा नव्या ड्रग्ज कार्टेलचा मास्टरमाईंड आहे. त्याने पुण्यातून आणि आळेफाट्यावरुन हे ड्रग्ज कोणाच्या मार्फतीने आणि ओळखीतून मिळविले, या तस्करीचा मुख्य ड्रग्ज पेडलर कोण, याचा तपास सुरु झाला आहे. त्यासाठी एनडीपीएस पथक पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात तपासासाठी जाणार आहे. या तपासात ड्रग्जची महत्त्वाची लिंक हाती लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार अटकेतील तिघांकडे सखोल चौकशी सुरु आहे.