
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बनावट शालार्थ आयडीद्वारे (Fake School ID) फसवणूक (Fraud) केल्याच्या घोटाळ्यात नाशिकरोडच्या तत्कालिन निलंबित पोलीस निरीक्षकालाही (पीआय) सहसंशयित करण्यात आले आहे. गुन्ह्यात जप्त केलेल्या मूळ हस्तलिखितात तपासी अधिकाऱ्याच्या अपरोक्ष फेरफार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दाखल शालार्थ घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यात पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अंमळनेर येथून संशयित मनोज रामचंद्र पाटील (रा. नवलनगर, धुळे), नीलेश निंबा पाटील (रा. चिंचोली, ता. चोपडा) या दोघांसह अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील (वय ६५) यांनाही अटक केली आहे. यापैकी मनोज व दत्तात्रय हे शिक्षण संस्थाचालक असून, नीलेश हा जिल्हा परिषदेतील कर्मचारी आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक रामदास शेळके तपास करीत आहेत. त्यांच्या पथकाने चार संशयितांना बेड्या (Arrested) ठोकल्या असून, उर्वरित पसार साथीदारांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी गुन्ह्यातील संशयित शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील यांच्याशी संगनमत केले. त्यानंतर तपासी अधिकाऱ्याच्या अपरोक्ष दस्तुरखुद्द पुराव्यांत फेरफार केला. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी गिरी यांच्यावर काही दिवसांपूर्वीच निलंबनाची कारवाई झाली होती. या गुन्ह्यातील संशयितांना अटक झाल्याने गिरी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते.
अशाप्रकारे फसवणूक
नाशिकचे तत्कालिन शिक्षण उपसंचालक तत्कालीन भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन २७ मार्च २०२५ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बनावट दस्तऐवजाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये लेखाधिकारी उदय पंचभाई व माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा हे संशयित आहेत. २१ डिसेंबर २०२३ ते २७ मार्च २०२५ पर्यंत हा घोटाळा झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांसह शाळांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यध्यापक यांच्याशी संगनमत करुन संशयितांनी शालार्थ प्रणालीमध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेख वापरुन बनावट शालार्थ आयडी बनवून तो अप्रमाणिकपणे खरा असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याचे नमूद आहे.




