नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रेल्वे प्रवासात झालेली एक ओळख एखाद्या सुखी कुटुंबाची शांतता कशी हिरावून घेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण नाशिकमधून (Nashik) समोर आले आहे. ज्या सासूबाईंनी विश्वासाने एका व्यक्तीचा नंबर जावयाला दिला, त्यांच्या निधनानंतर तोच व्यक्ती महाठग निघाला. ऑस्ट्रेलियात नोकरी (Job) लावण्याचे आमिष दाखवून पंजाबच्या एका चोरट्याने सिडकोतील कंपनी मॅनेजरला चक्क ५ लाख ४३ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. अंबड पोलिसांनी (Ambad Police) संशयिताला नोटीस बजावली असून अटकेची टांगती तलवार कायम आहे.
मूळचे पंजाबचे असलेले मनोज धरमसिंग नांगला (वय ३९, रा.पवननगर, सिडको) हे नाशिकच्या एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. सन २०२३ मध्ये त्यांच्या सासूबाई रेल्वेने पंजाबवरून मनमाडकडे येत असताना या प्रवासात त्यांची ओळख जतिंदरसिंग परमजितसिंग (रा. न्यू दशमेशनगर अर्थात जालंधर सिटी, पंजाब) या संशयिताशी झाली. “मी भारतीय तरुणांना ऑस्ट्रेलियात मोठ्या पगाराची नोकरी लावून देतो, ” असे सांगून जतिंदरसिंगने सासूबाईंचा विश्वास संपादन केला. त्यांनीही जावयाचे भले व्हावे या हेतूने जतिंदरसिंगचा नंबर सेव्ह करुन मनोज यांना दिला. मात्र, हाच नंबर पुढे आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
जतिंदरसिंगने नाशिक गाठले आणि मनोज यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांच्या पासपोर्टची प्रक्रियाही सुरू केली. १७ जून २०२४ रोजी त्याने मनोज यांच्या व्हॉट्सअॅपवर चक्क ऑस्ट्रेलियाचा व्हिसा आणि प्राईम फ्लोअर मिल्स नावाच्या कंपनीचे नियुक्तीपत्र पाठवले. ऑस्ट्रलियन सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स चे बनावट शिक्के मारलेली ही कागदपत्रे पाहून मनोज यांनी खात्री पटली आणि त्यांनी नाशिकमधील चांगली नोकरी सोडली. व्हिसा प्रोसेसिंग, कागदपत्रे आणि इतर शुल्काच्या नावाखाली जतिंदरसिंगने मनोज यांच्याकडून कधी गुगल पे, कधी आरटीजीएस तर कधी प्रत्यक्ष रोख स्वरूपात त्याने एकूण ५ लाख ४३ हजार रुपये लाटले. यादरम्यान, मनोज यांच्या सासूबाईंचे आकस्मिक निधन (Death) झाले.
चौदा दिवसांचा अल्टिमेटम
दोन वर्षे उलटली तरी नोकरीचा पत्ता नाही आणि दिलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यावर मनोज यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांनी तपास चक्रे फिरवली आहेत. संशयित जतिंदरसिंग याला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असून, १४ दिवसांत तो हजर न झाल्यास थेट पंजाबमध्ये जाऊन त्याला बेड्या ठोकल्या जाणार आहेत.





