Friday, June 19, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशिकच्या भाजप पदाधिकार्‍यास 'सेटलमेंट'मधून दहा कोटींचा गंडा; माजी केंद्रीय...

Nashik Crime : नाशिकच्या भाजप पदाधिकार्‍यास ‘सेटलमेंट’मधून दहा कोटींचा गंडा; माजी केंद्रीय मंत्री दानवेंची ‘मध्यस्थी’

साथीदारांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिडकोतील भाजपच्या (BJP) माजी नगरसेविका अलका आहिरे यांचे पती कैलास आहिरे यांची ‘कर्ज सेटलमेंट प्रकरणात दहा कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) झाली आहे. विशेष म्हणजे प्रकरणात माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा सहभाग असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आल्याने भाजप वर्तुळात खळबळ उडाली असून, सातपूर पोलिसांकडून दानवेंच्या चौकशीची शक्यता आहे. सध्या केवळ गुन्हाच ‘नोंद’ असून तपासादरम्यान अद्याप कुणालाही अटक झालेली नाही हे ‘विशेष’ प्रकषनि दिसून येत आहे.

- Advertisement -

दाखल फिर्यादीनुसार, गिरीश नारायण पवार (रा. सोमेरेस्टे को, ऑप सोसा., हिरानंदानी गार्डनजवळ, पवई, मुंबई), कौस्तुभशेखर लटके (रा. एव्होलिना, हिरानंदानी इस्टेट, पाटीलपाडा, ठाणे), शिवम् मुकेश पाटील (रा. एक्स्टसी सोसा., कोथरुड, पुणे), सतीश कश्मिरीलाल अग्रवाल (रा., शिवाजी पुतळ्याजवळ, भारतनगर, जालना), धीरेंद्र महेंद्र प्रसाद मेहरा (रा. नवीन मोंढा रोड, श्रीकृष्ण रुक्मिणी नगर, जालना), संजय सुभाष कतीरा, सुभाष हंसराज कतीरा (दोघे रा. पालमायरा बिल्डिंग, स्कायलाइन ओएसिस, विद्याविहार, घाटकोपर), मंदार टाकळकर (रा. छ. संभाजीनगर) या संशयितांची (Suspected) नावे नमूद आहे.

भाजपचे कैलास लक्ष्मण आहिरे (वय ५९, रा. दीपआकाश, खुटवडनगर, सिडको) यांनी २७ऑक्टोबर रोजी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) दिलेल्या फिर्यादीनुसार, सातपूर एमआयडीसीत ‘एनव्ही’ ऑटोस्पेअर्स प्रा. लि. कंपनी असून सन २०१० पासून पत्नी ‘अलका’ सह त्यांच्या नावावर आहे. दरम्यान, कंपनीवर ‘सेंटल बैंक ऑफ इंडिया’ चे कर्ज थकल्याने सप्टेंबर २०१८ मध्ये मुंबईत भाजपचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खा. रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन ‘कर्ज असल्याने पैशांच्या मदतीची गरज असल्याचे सांगितले.

यानंतर दानवे यांनी, ‘बँकेसोबत बोलणी करुन सेटलमेंट करून देतो’ असे आहिरे यांना सांगून नाशिकमधील ‘रेडक्रॉस’च्या बैंक ऑफ इंडियाचे तत्कालीन शाखा प्रबंधक कदम यांच्यासोबत ‘लोन सेटलमेंट’ बाबत बोलणी केली व दानवे यांनी ‘मी प्रथम नाशिकला तुमची कंपनी बघतो, त्यानंतर शेअर्सबाबत चर्चा करु’, असे सांगितले. दानवे हे सन २०१८ मध्ये अनेकदा वरील संशयितांसह नाशिकला आले. तेव्हा त्यांनी ‘कंपनी’ची पाहणी केली असता दानवे यांनी ‘मी तुम्हाला पाचशे कोटी रुपयांचा बार्षिक ‘टर्नओव्हर’ करुन देतो, त्या बदल्यात कंपनीचे चौदा टक्के शेअर्स गिरीश पवार यांना द्या’, असे सांगितले. तसेच यानंतर, कंपनीचे सर्वच कामकाज आता पवार पाहतील, असे सांगून दानवेंसह पवार आणि आहिरे व गुलाबराव पाटील यांनी होकार दर्शविला.

असा ठरला व्यवहार

दानवेंच्या ‘मध्यस्थीने सर्वांसमक्ष पंचवीस कोटींचे शेअर्स आहिरे हे गिरीश पवार यांना देतील, असे ठरले, अतिरिक्त संचालक म्हणून कंपनीवर गिरीश पवार नियुक्त आहेत, असे पत्र पवार यांनी आहिरेंना देऊन पन्नास लाख तर, सतीश अग्रवाल यांनी पन्नास लाख असे एक कोटी रुपये धनादेशाद्वारे अहिरेंसह अलका यांना दिले. उर्वरित ‘चोवीस कोटी रुपये कधी देणार’ याबाबत विचारले असता दानवे यांनी हे पैसे पवार आता ‘ऑनलाईन’ देतील असे सांगितले. मात्र, पवार यांनी हेतूपुरस्सर आहिरे यांच्या कंपनीचे चौदा टक्के शेअर्स ‘इतरत्र’ वर्ग करुन लटके, पाटील व मेहरा यांना संचालकपद दिले व रजिस्टर ऑफ कंपनीज विभागाकडे (आरओसी) जादा संचालक पदांची परस्पर नोंद केली. आहिरे यांनी चोवीस कोटी रुपये मागितले असता, संशयितांनी चालढकल केली. मात्र, कतीरा यांनी नऊ कोटी ७० लाख हजार व गिरीश पवार यांनी कोटी, ६४ लाख, ११ हजार असे एकूण चौदा कोटी चौतीस लाख अठ्यांन्नव हजार रुपये ‘आरटीजीएस’ ने परत केले आहेत.

अपिलाचा सल्ला!

चौदा कोटी रुपये मिळाल्यावर आहिरे यांनी उर्वरित दहा कोटी रुपये मिळण्यासाठी प्रयत्न केले असतानाच पवारसह कतीरा यांनी ४ मार्च २०२० मध्ये याउलट आहिरे यांना वकिलांकरवी ‘नोटीस पाठवून ‘आरटीजीएस’ रक्कम परत करण्याची मागणी केली. त्यानंतर पवार आणि कतीराने ‘रजिस्टर ऑफ कंपनी’ विभागाकडे (आरओसी) दाबा दाखल केला असता, हा निकाल आहिरेंविरोधात लागला. ही सर्व बाब दानवेंना सांगितली असता, त्यांनी सारवासारव करुन उलट निकालाविरोधात ‘अपील’ करा असा सल्ला दिल्याचे आहिरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

ठळक मुद्दे

  • सध्याच्या ‘धड़क’ कारवाईबाबत ठोस बोलणाऱ्या पोलिसांचे या गुन्ह्यात मौन का ?
  • आहिरेंकडून २५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल
  • सातपूर व अंबड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यावरुन चर्चा
  • एमआयडीसी सातपूर हद्दीत असल्याने संबंधित पोलिसांत अर्ज वर्ग
  • माजी मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख असल्याने पडताळणीअंती गुन्हा.
  • ‘एनसीआरबी’वर २७ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंद.
  • २७ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० मिनिटांनी फिर्याद दाखल, आहिरेंची पुन्हा त्यावर स्वाक्षरी.
  • दैनंदिन गुन्हे अहवालात २ नोव्हेंबरपर्यंत गुन्ह्याचा उल्लेखच नाही

ताज्या बातम्या