नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ग्रामीण पोलिस दलाकडून (Rural Police Force) जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला सुमारे २० कोटी ७० लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच सायबर फसवणूक (Fraud) प्रकरणातील ५८ लाख रुपये संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. यासह पोलीस पाटलांचा गुणगौरवही करण्यात आला. जिल्हा पाेलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने जिल्ह्यातील विविध गुन्हे उघड करुन पाेलीस ठाण्यांसह गुन्हे पथकांनी २३० हून संशयितांना गजाआड केले आहे.
ग्रामीण मुख्यालयात गुरुवारी (दि. १८) मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाटलांचा गुणगौरवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे प्रमुख अतिथी उपस्थित होते. कार्यक्रमात नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील ४० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल चोरी तसेच मंदिर चोरीच्या गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला एकूण २० कोटी ७० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना अधिकृतपणे परत करण्यात आला. यामध्ये वाहने, दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्याचा समावेश आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासात ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) झालेल्या नागरिकांना ५८ लाख रुपये प्रतिकात्मक स्वरूपात परत देण्यात आले.
तसेच सायबर पोलिस (Cyber Police) पथकाने शोधून काढलेले २३० हरवलेले मोबाईल फोन तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.लयाच कार्यक्रमात गुन्हे उघडकीस आणण्यात, तपासात व कायदा-सुव्यवस्था राखण्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील पोलिस पाटलांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा गुणगौरव करण्यात आला. नागरिकांनी पोलिसांशी समन्वय राखून माहिती देणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी पाेलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केले.




