नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जालन्यातील (Jalna) नूतन वसाहतीत शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री जुन्या वादातून आई- वडिलांसमोर मुलाची हत्या (Murder) करुन पसार झालेल्या टोळीच्या सूत्रधारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने (Unit One) शनिवारी सकाळी नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातून (Nashik Road Railway Station) अटक केली.
विकास प्रकाश लोंढे याची हत्या केल्यानंतर मुख्य सूत्रधार विशाल उर्फ वांग्या शिवाजी गायकवाड (वय-२४, रा- लहूजी चौक, नूतन वसाहत, जालना) हा पसार होऊन नाशकात (Nashik) आला. दरम्यान, तो नाशिकरोड परिसरात आल्याची माहिती मिळताच सहायक आयुक्त संदीप मिटके, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक आंचल मुदगल यांच्या सूचनेने पथकाने सापळा रचून त्याला गजाआड केले.
मृत विकास लोंढे (वय २५, रा. नूतन वसाहत) हा जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांचा मुलगा होता. तो शुक्रवारी (दि.२४) मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान नातेवाईकाच्या विवाह समारंभातून घरी परतत होता. घरापासून अवघ्या काही अंतरावर असतानाच काही टवाळखोरांनी त्याला अडवले. तेव्हा आई वडिलांसमोरच जुना वाद उकरून काढत टवाळखोरांनी त्याला जातिवाचक शिवीगाळ करुन अमानुष मारहाण केली.
आरडाओरडा ऐकून भांडण सोडवण्यासाठी त्याचे आई वडील धावले. मात्र, संशयितांनी विकासवर लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली. त्यात त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. याबाबत जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २५) खुनासह अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांचा शोध सुरु असताना मुख्य सूत्रधार वांग्या उर्फ विशाल हा नाशिकमध्ये आल्याचे कळताच ही कारवाई करण्यात आली.
त्याने हात जोडून दिल्या घोषणा
वांग्याला अटक करुन युनिट एकमध्ये आणण्यात आले. त्यानंतर, त्याचा विशेष पाहुणचार करुन दिवाळी फराळातील ‘कडक’ लाडूसह फटाके देण्यात आले. यानंतर त्याने युनिट एकच्या अंमलदारांचा ‘सहारा’ घेत कार्यालयाबाहेर येऊन हात जोडत ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशा घोषणा दिल्या. या फराळ वाटपानंतर त्याचा ताबा कदीम पोलीस ठाण्याकडे सोपविण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी जालना पोलीस उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले.




