नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पाकिस्तानातील लाहोरचा (Pakistan Lahor) कुख्यात गैंगस्टर आणि सध्या दुबईतून नेटवर्क चालवणाऱ्या शहजाद भट्टी (Shahzad Bhatti) याच्या संशयास्पद संपर्कात असलेल्या देशविघातक प्रवृत्तींविरुद्ध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी (दि. १०) पहाटेपासून राज्यात प्रचंड मोठे सर्च ऑपरेशन राबवले. नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर, अकोला आणि नांदेड अशा विविध शहरांमध्ये तब्बल १५० ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईने खळबळ उडाली असून, एकट्या नाशिक परिक्षेत्रातून तब्बल २१ जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या गोपनीय माहितीनंतर महाराष्ट्र एटीएसने शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ठरवून दिलेल्या टार्गेटवर धडक दिली. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक शहर, मालेगाव, जळगाव आणि अहिल्यानगर (अहमदनगर) सह एकूण आठ संवेदनशील ठिकाणी हे छापासत्र राबवण्यात आले. या कारवाईचे स्वरूप गोपनीय ठेवण्यात आले होते. नाशिकमधील काही तरुण भट्टीच्या सिंडिकेटशी डिजिटल आणि
सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून संपर्कात असल्याचा दाट संशय एटीएसला आहे. नाशिकमधून अद्याप अधिकृतपणे कुणालाही अटक करण्यात आलेली नसली, तरी संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आली आहेत. एटीएसचे तांत्रिक पथक यामोबाईल आणि डेटाची कसून तपासणी करत आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) परिक्षेत्रातील संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, एटीएसची ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दुबईतून हलवतोय सूत्रे
शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून, तो तिथला कुख्यात गैंगस्टर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याने दुबईत ठाण मांडले असून, तिथूनच तो आपले गुन्हेगारी आणि देशविरोधी साम्राज्य चालवत आहे. त्याचे पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवादी घटकांशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियाचा गैरवापर
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांना टार्गेट करत आहे. तरुणांना पैशांचे आमिष दाखवून, चिथावणी देऊन किंवा चुकीची माहिती पुरवून त्यांना मअनलॉफुल अॅक्टिव्हिटीजफ (बेकायदेशीर आणि देशविरोधी कृत्ये) मध्ये ओढण्याचा त्याचा मुख्य कट आहे. या संपूर्ण कारवाईत राज्यातील शेकडो संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे.




