नाशिक | प्रतिनिधी | Nashik
न्यायालयीन (Court) कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या विश्वासाचे ठिकाण असलेल्या नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा परिसर एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या (Fraud) कटाचा केंद्रबिंदू ठरल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आवारातच बनावट कागदपत्रे तयार करून विंचूर येथील कोट्यवधींची जमीन तारण ठेवत एका खाजगी बँकेकडून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) एका महिला संस्थेच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) विंचूर येथील शेतकरी व व्यावसायिक संतोष मुरलीधर उशीर (वय ५१) हे टॉप सेल कॉर्पोरेशन या भागीदारी फर्मचे भागीदार आहेत. १८ मार्च २०२५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संशयितांनी सीबीएस रोडवरील जिल्हा न्यायालयाच्या आवारात एकत्र येत कट रचला. संतोष उशीर यांच्या संमतीशिवाय, त्यांची कोणतीही सही किंवा अंगठ्याचा ठसा नसताना अॅडमिशन कम रिटायरमेंट नावाचा बनावट व बोगस दस्तऐवज तयार करण्यात आला. या दस्तऐवजाद्वारे उशीर हे फर्ममधून निवृत्त झाल्याचे भासवण्यात आले आणि त्यांच्या जागी संशयित मनीषा दत्तात्रय शिंदे (जाधव) या नवीन भागीदार म्हणून दाखल झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेले.
बँक अधिकाऱ्याच्या डोळ्यात धूळफेक
बनावट दस्तऐवजाच्या (Fake Document) आधारे संशयितांनी मे. कृषीसाधना महिला शेतमाल उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था या नावाने अशोका मार्ग येथील एका खाजगी बँकेच्या शाखेत ३ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव दाखल केला. हे कर्ज मंजूर करून घेण्यासाठी टॉप सेल कॉर्पोरेशन फर्मच्या मालकीची विंचूर येथील मौल्यवान शेतजमीन बँकेकडे तारण ठेवली. मूळ मालकाला अंधारात ठेवून परस्पर जमीन तारण गहाण टाकत बँकेची आणि जमीन मालकाची फसवणूक करण्यात आली.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
संतोष उशीर यांच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित मनीषा दत्तात्रय जाधव (रा. विंचूर, ता. निफाड), साधना जाधव (रा. विंचूर, ता. निफाड), दीपक शशिकांत खैरनार (रा. विंचूर, ता. निफाड), युवराज श्रीपत सोनवणे (रा. विंचूर, ता. निफाड) व मोनीश गोविंदराव देवरे (रा. गोविंद नगर, नाशिक) यांच्यावर फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




