नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक-धुळे (Nashik-Dhule) इलेक्ट्रिक बसमध्ये बसताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत चाेरट्याने तब्बल १४ लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील चंपाबाग भागात राहणारे व सेवानिवृत्त विश्वनाथ आत्माराम सोनार (वय ६९) हे पत्नीसह नाशिक येथे आले होते. शुक्रवारी सकाळी ते धुळ्यास परत जाण्यासाठी नवीन मेळा बसस्थानकावर (Bus Stand) पोहोचले. तेथील फलाटावर नाशिक-धुळे मार्गावरील एसटी महामंडळाची ई-बस लागलेली होती. बसमध्ये बसताना प्रवाशांची गर्दी झाली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञाताने सोनार दाम्पत्याच्या बॅगेतून शिताफीने दागिने लांबवले.
बसमध्ये बसल्यानंतर अथवा तपासणीदरम्यान दागिने गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर दाम्पत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर, विश्वनाथ सोनार यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा (Case) दाखल केला असून, उपनिरीक्षक (PSI) नितीन फुलपगारे तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे सराईत पाकिटमार व चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
महिला -पुरुष चाेरांची टाेळी
नाशिकच्या बसस्थानकांवर विशेषतः मेळा आणि ठक्कर बाजार परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवाशांना लक्ष्य केले जात असताना सुरक्षा यंत्रणा मात्र ढिम्म असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नव्याने सुरू झालेल्या इलेक्ट्रिक गाड्यांना प्रवाशांची पसंती आहे. त्यामुळे या गाड्यांच्या फलाटावर चढण्यासाठी नेहमीच चढाओढ असते. या धक्काबुक्कीचा फायदा थेट चोरटे उचलत आहेत. मेळा बसस्थानकावर गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलीस किंवा स्थानिक पोलिसांचे बीट मार्शल फिरकतही नाहीत. तसेच महामंडळाचे सुरक्षारक्षक केवळ चौकशी खिडकीपुरते मर्यादित राहिल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे.
चोरीस गेलेला ऐवज
सोन्याची पोत (२ नग, ७० ग्रॅम) : ७ लाख रुपये
सोन्याची मोहनमाळ (१० ग्रॅम) : १ लाख रुपये
सोन्याचे नेकलेस (२ नग, २० ग्रॅम) : २ लाख रुपये
सोन्याची साखळी/चेन (२ नग, २० ग्रॅम) : २ लाख रुपये
सोन्याच्या अंगठ्या (७ नग, १८ ग्रॅम) : १ लाख ८० हजार रुपये
कानातील टॉप्स (५ ग्रॅम) : ५० हजार रुपये
रोख रक्कम : ५०० रुपयांच्या ६ नोटा (३ हजार रुपये)
(एकूण : १४ लाख ३३ हजार रुपये)




