पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
सोशल मीडियावर (Social Media) हातात धारदार कोयता (Koyata) घेऊन ‘स्टोरी’ पोस्ट करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला आडगाव पोलिसांनी (Aadgaon Police) अटक (Arrested) केली. आरोपीकडून एक धारदार कोयता जप्त करण्यात आला असून, ही कारवाई आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी गुन्हे शोध पथकातील (Crime Detection Squad) पोलिस हवालदार दादासाहेब वाघ आणि पोलिस अंमलदार सुमित शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली होती. बिडीकामगार नगर येथील महापालिका शाळेकडून निलगिरी बागकडे जाणाऱ्या पाटाच्या रस्त्यावर एक तरुण हातात धारदार कोयता घेऊन फिरत असून, त्याने तोच कोयता सोशल मीडियावर ‘स्टोरी’ स्वरूपात पोस्ट करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास पोलिस हवालदार दादासाहेब वाघ, पोलिस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. बिडीकामगार नगर येथील गोठ्याजवळ अंधारात संशयास्पद हालचाल करणारा तरुण दिसताच पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाठलाग करून पथकाने त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, चौकशीत त्याची ओळख आशिष भिकन गांगुर्डे (वय २४, रा. म्हाडा बिल्डिंग, पंचकृष्ण लॉन्सजवळ, कोणार्क नगर) अशी पटली. अंगझडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूस लपवून ठेवलेला धारदार कोयता जप्त करण्यात आला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात (Aadgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस अंमलदार सुमित शिंदे करीत आहेत.
पोलिस पथकाची कारवाई
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ-१च्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण, पोलिस निरीक्षक दिलीप राठोड, गौतम वाबळे, सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, सतीश जगदाळे, महिला पोलिस उपनिरीक्षक योगिता पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील पोलिस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, मनोज परदेशी, पोलिस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रविंद्र लिलके, प्रितम बोराटे, कुणाल राऊत, दीपक भुजबळ आणि महिला पोलिस हवालदार वैशाली बच्छाव यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.




