नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील लेखानगर (भुजबळ फार्म) परिसरातील हॉटेल अनुशामधील रूम नंबर १०४ मध्ये क्रिकेटवर (Cricket) सट्टा खेळला जात असल्याचे एका छाप्यातून (Raid) समोर आले आहे. अंबड पोलिसांनी (Ambad Police) शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात या गोपनीय सट्टाबाजाराचा पर्दाफाश झाला. या कारवाईत जळगावच्या मुख्य संशयितांसह चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून महागडे फोल्डेबल मोबाइल, लॅपटॉप आणि डायरी जप्त केली आहे.
योगेश प्रदीप महाजन (३१, रा. गंगासागर, शिव कॉलनी, जळगाव) हा मुख्य सूत्रधार असून सागर नवल तायडे (३३, रा. रिंगरोड, जळगाव), सत्यम रघुनाथ भोई (३९, रा. नारायणनगर, जळगाव) व विनायक लक्ष्मण जाधव (३९, रा. सिडको, नाशिक) अशी संशयित सट्टेबाजांची (Bookies) नावे आहेत. हे सराईत थेट क्रिकेट सामन्याच्या प्रक्षेपणावर अवलंबून न राहता क्रिकेट लाइन गुरु या बेकायदेशीर वेबसाइटचा वापर करत होते असे तपासात समोर आले आहे.
या डिजिटल यंत्रणेचा गैरवापर करून संशयितांनी १३ हून अधिक संशयितांशी (क्लायंट्स) एकाच वेळी संपर्क साधला होता. या टोळीने क्लाईट्शी संपर्क साधण्यासाठी आणि सट्ट्याची देवाणघेवाण करण्यासाठी जिओ, व्हीआय, एअरटेल कंपन्यांची सीमकार्ड वापरली असून ती इतरांच्या नावे रजिस्टर्ड असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) फसवणुकीसह महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा पडला पोलिसांचा वेढा
अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेद्रसिंग राजपूत यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक विलास पडोळकर, उपनिरीक्षक पाडवी आणि हवालदार विनोद गोरे व ठुबे यांच्या पथकाने २९ मे रोजी रात्री साडेदहा वाजता हॉटेल अनुशावर छापा टाकला. येथील रूम नंबर १०४ मध्ये सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड-४ आणि अल्ट्रा फोनवर चालू मॅचच्या सट्ट्याची आकडेमोड सुरू असतानाच चौघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईत दोन लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक लाखाचा सॅमसंग फोल्ड फोन, ८० हजारांचा सॅमसंग अल्ट्रा, एक एचपी कंपनीचा लॅपटॉप आणि हिशेब वही जप्त केली आहे.




