नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देवाचा अवतार आणि भविष्यवाणीच्या भीतीतून महिलांवर अत्याचार करणाऱ्या संशयित अशोक खरातने (Ashok Kharat) खंडणी उकळल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका वर्षांत तीन पूजा करण्याचे सांगत काल्पनिक कथा रंगवल्या असून, खंडणीचा एक गुन्हा नाशिक पोलिसांत (Nashik Police) नोंदविण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे, स्वतःच्या बचावासाठी मॉर्फ व्हिडिओबाबत बनावट गुन्हा नोंदवणे खरातच्या अंगलट आले आहे.
लैंगिक अत्याचार (Rape) करणाऱ्या खरातने कुकर्मांसह खून अथवा नरबळी केल्याचा संशय एसआयटीला असताना त्याच्या विदेश दौऱ्यामागेही भोंदूगिरीचा पैसा असल्याचे उघड झाले आहे. त्याने पूजा करण्याचा दावा करून पैसे उकळून दौरे घडवून आणल्याचे समोर आले आहे. त्यावरून सरकारवाडा पोलिसांत बुधवारी (दि. २५) रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे खरातच्या कुकर्मांवरून दाखल गुन्ह्यांची संख्या आठ झाली असून एकूण दहा गुन्हांचा तपास एसआयटी करीत आहे.
शैक्षणिक सल्ल्यावेळी अत्याचार
सातव्या गुन्ह्यातील शिर्डी (Shirdi) येथील पीडिता युवती असताना कुटुंबासह सन २०२१ मध्ये सिन्नरच्या ईशानेश्वर महादेव मंदिरात गेली होती. तिथे खरातबद्दल तिला माहिती मिळाली. खरातकडे दैवी शक्ती असून ते आजारपण, आर्थिक अडचणी, नोकरी आणि शैक्षणिक समस्यांवर तोडगा काढतात, असे पीडितेला सांगण्यात आले. फेब्रुवारी २०२१ मध्ये पीडितेसह तिच्या पालकांची खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात भेट झाली. जुलै २०२४ मध्ये शैक्षणिक सल्ल्यासाठी गेलेल्या पीडितेला खरातने तांब्याच्या पेल्यातून बेचव पाणी प्यायला दिले. गुंगीच्या नशेत तिच्यावर अत्याचार केले. जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात अंदाजे चार वेळा ही घटना घडली. डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेला अनोळखी क्रमांकावरून गैरकृत्याचा व्हिडिओ आला. कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे बनवलेला बनावट व्हिडिओ असल्याचे सांगून खरातने पीडितेची दिशाभूल केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल करत ऑफिसबॉयला बनवले ‘बळीचा बकरा’
वावी पोलिसांवर संशय
शिर्डी पोलिसांत (Shirdi Police) मॉर्फ व्हिडिओप्रकरणी गुन्हा नोंद होताच तपासाची सूत्रे फिरली. खरातचेच कुकर्म त्यातून स्पष्ट होण्याची चिन्हे असताना एका विभागातून राजकीय दबाव आल्याचे समजते. त्यामुळे थेट गृह मंत्रालयाने या प्रकरणात कारवाईचे आदेश देत सूत्रे नाशिक शहर पोलिसांकडे दिली. त्यावेळी नाशिक पोलिस आयुक्तालयाने पीडितेला विश्वासात घेत गुन्हा नोंदवून खरातला बेड्या ठोकत कुकर्मांची यादी उघड केली. दरम्यान, वावी पोलिसांत डिसेंबर २०२५ मध्ये नोंद झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित झाला असता तर तेव्हाच खरातचे पितळ उघड झाले असते. त्यामुळे आता वावी व नाशिक ग्रामीण पोलिसांभोवती संशयाची सुई फिरत आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातच्या अघोरी कृत्यांनी नाशिक हादरले; SIT तपासात अंगावर शहारे आणणारी माहिती समोर




