नाशिक । प्रतिनिधी | Nashik
एका कंपनीच्या (Company) मुख्य संचालकांचा (सीईओ) मायक्रोसॉफ्ट टीम्स या ॲपवर बनावट आयडी बनवून, कंपनीच्या अकाउंट्स (Account) हेडवर दबाव टाकत तब्बल ९६ लाख रुपये भलत्याच खात्यात वर्ग करण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोड परिसरातील प्रतिष्ठित ‘रेस सॉफ्टवेअर अँड एज्युकेशन टेक्नॉलॉजिज प्रा. लि.’ या कंपनीचे संचालक सुरेश चंद्र मल्होत्रा (वय ८८) यांनी या प्रकरणी सायबर पोलिसांत (Cyber Police) फिर्याद दिली आहे.
२२ जुलै रोजी कंपनीचे मुख्य संचालक (डायरेक्टर) राहुल मल्होत्रा हे कामानिमित्त अमेरिकेत होते. या संधीचा गैरफायदा घेत सायबरच चाेरट्याने मायक्रोसॉफ्ट टीम्सवर राहुल मल्होत्रा यांच्या नावाने एक हुबेहूब बनावट प्रोफाइल आयडी तयार केला. या आयडीवरून संशयिताने (Suspected) कंपनीच्या अकाउंट्स हेड अंजली मुळे यांच्याशी संवाद साधला. ”मी सध्या एका महत्त्वाच्या सरकारी प्रकल्पाच्या बैठकीत व्यस्त आहे,” असा बनाव चाेराने रचला. यानंतर अत्यंत गोपनीयरीत्या एका विशिष्ट खात्यावर तातडीने ९६ लाख रुपये आरटीजीएस (आरटीजीएस) द्वारे पाठवण्याचे आदेश दिले.
यासाठी चोरट्याने (Thief) कोटक महिंद्रा बँकेच्या उडुपी शाखेतील ‘S S Shetty Group of Companies OPC Private Limited’ या नावाचा खाते क्रमांक व तपशील पाठवला. अकाउंट्स हेड मुळे यांनी थेट फोनवर बोलण्याची विनंती केली असता, “बैठकीत असल्याने बोलणे शक्य नाही, उशीर झाल्यास प्रकल्पाचे नुकसान होईल,” असा धाक दाखवून संशयिताने त्यांच्यावर दबाव आणला. सीईओंचाच संदेश आहे असा गैरसमज झाल्याने, त्यांनी संचालकांची स्वाक्षरी घेऊन बँकेत आरटीजीएस फॉर्म जमा केला आणि पैसे वर्ग झाले.
अन् असा उघड झाला प्रकार!
व्यवहार झाल्यानंतर संशय बळावल्याने अकाउंट्स हेड यांनी तातडीने राहुल मल्होत्रा यांच्या मूळ व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या तत्काळ लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कोटक महिंद्रा बँकेशी संपर्क साधून सदर व्यवहार रोखण्याची आणि रक्कम गोठवण्याची विनंती केली. बँक आणि कंपनीच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला असला तरी या हायटेक सायबर गुन्ह्याने उद्योजक वर्गात खळबळ उडाली आहे.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
सुरेश चंद्र मल्होत्रा यांच्या तक्रारीवरून नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber City Police Station) अज्ञात चाेरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे आंतरराष्ट्रीयआंतरराज्यीय धागेदारे असलेल्या गुन्ह्याचा तपास करत आहेत.




