Saturday, November 7, 2026
HomeनाशिकShalarth ID Scam : शिपाई की एजंट? उच्च न्यायालयात कुलकर्णीचा कारनामा उघड;...

Shalarth ID Scam : शिपाई की एजंट? उच्च न्यायालयात कुलकर्णीचा कारनामा उघड; अटकपूर्व जामीन फेटाळला

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिक्षण विभागातील (Education Department) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात केवळ शिपाई असल्याचे सांगून बचाव करू पाहणाऱ्या अमोल रमेश कुलकर्णी याला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मी तर केवळ वरिष्ठांच्या सांगण्यावरून काम करणारा शिपाई आहे, असा दावा करत अमोल कुलकर्णी याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती माधव जामदार यांनी फेटाळून लावला. तपासात कुलकर्णी हा शिपाई नसून संस्थाचालकांचा एजंट म्हणून काम करत शिक्षकांकडून पैसे उकळत असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) मुक्ताईनगर तालुक्यातील एम. एफ. तराळ विद्यालय, अंतुर्ली या शाळेशी संबंधित दाेन कोटींच्या घोटाळ्यात अमोल कुलकर्णी संशयित आहे. त्याने न्यायालयात अर्ज सादर करताना, मी केवळ शिपाई असून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले आहे, माझा यात काहीही सहभाग नाही,” असा बचावात्मक पवित्रा घेतला होता. मात्र, सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांनुसार कुलकर्णी हा शाळा व्यवस्थापनाचा एजंट म्हणून कार्यरत होता.

शिक्षकांकडून व कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे आणि मागील तारखांचे बोगस प्रस्ताव तयार करून त्यावर सह्या मिळवणे, अशी भूमिका कुलकर्णी बजावत असल्याचे तपासात उघडकीस आले. कुलकर्णी याने या घोटाळ्यात बोगस दस्तऐवज वैध दाखवण्यासाठी चाणाक्षपणे काम केले. शाळेतील २०१४ ते २०१७ दरम्यान कार्यरत असलेल्या रामदास पाटील या माजी मुख्याध्यापकांकडे कुलकर्णी स्वतः गेला होता आणि मागील तारखेच्या प्रस्तावांवर सह्या मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाटील यांनी कार्यकाळ संपुष्टात आल्याचे सांगत सह्या करण्यास नकार दिला. त्यांच्या या साक्षीमुळे कुलकर्णी याचे पितळ उघडे पडले आहे.

एसआयटीकडून झाडाझडती

नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) सन २०२५ व सन २०२६ मध्ये बनावट शालार्थ आयडी तयार केल्याबाबत दोन स्वतंत्र गुन्हे नोंद आहेत. राज्य शासन आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. हा तपास महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला असून व्याप्ती वाढल्याने आता थेट अकरा पथके नेमले आहेत. त्यामध्ये उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके, डॉ. सचिन बारी यांच्यासह ४६ अधिकारी व ८० पेक्षा जास्त अंमलदारांचा समावेश आहे.

​दाेन कोटींचा अपहार अन् ९६ पदांचा घोटाळा

नाशिक विभागातील विविध शाळांमध्ये २०२२ ते २०२४ या काळात ९६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या २०१२ व २०१४ पासूनच्या दाखवून शासनाकडून तब्बल कोट्यवधी रुपयांचा फरक लाटण्यात आला. एकट्या अंतुर्ली येथील तराळ विद्यालयात १७ बोगस नियुक्त्या दाखवून २ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार करण्यात आला आहे, असे निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्या

दिंडोरीतील सशस्त्र दरोड्याचा २४ तासांत छडा; चार आरोपी जेरबंद

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणोरवाडी शिवारात शेतवस्तीवरील घरात घुसून सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे....