
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सोशल मीडियाचा (Social Media) अतिवापर आणि अज्ञात लिंकवर सहज होणारे क्लिक आता नागरिकांचे बँक खाते शून्य करण्यास कारणीभूत ठरत आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आकर्षक जाहिराती देऊन पोर्नाेग्राफीचा मोह दाखवायचा आणि त्याद्वारे मोबाईलमध्ये मालवेअर टाकायचा, असा एक नवा सायबर गुन्हा वेगाने पसरत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबरक्राईम थ्रेट अॅनालिटिक्स युनिटने (एनसीटीएयू) यासंदर्भात सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रीलूप, नाईट प्ले, किस्स, विमा, रीवो, नेक्सो आणि व्हिक्सा यांसारख्या नावांनी पोर्नाेग्राफिक अॅप्सच्या आकर्षक जाहिराती दाखवल्या जातात. यूझरने या जाहिरातीवर क्लिक केल्यास त्याला एका फिंमिंग वेबसाईटवर नेले जाते. तेथून गूगल प्ले स्टाेअर बाहेरून एपीके फाईल डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले जाते. अॅप इन्स्टॉल होताच, युझरकडून परमिशन मागितली जाते.
एकदा ही परवानगी दिली, की हे अॅप मोबाईलचा (Mobile) पूर्ण ताबा घेते. हे मालवेअर युझरच्या नकळत स्क्रीनवरील हालचाली वाचू शकते, मेसेजमधील ओटीपी व पीन चोरू शकते आणि यूझरच्या नकळत बँक खात्यातून (Bank Account) पैसे ट्रान्सफर करू शकते. एवढेच नव्हे तर, मागोवा घेता येऊ नये म्हणून हे अॅप्स स्वतःच मोबाईलमध्ये बॅकग्राउंडला व्हीपीएन इन्स्टॉल करतात.
अॅप इन्स्टॉल झाल्यास काय करावे?
हॅकिंगमुळे हे अॅप सामान्य मार्गाने अनइन्स्टॉल होत नाही. त्यासाठी केंद्रीय यंत्रणेने दोन मार्ग सुचवले आहेत
सेफ मोड, रीबूट
१. मोबाईलचे पॉवर बटण दाबून ठेवा आणि सेफ माेेड निवडून फोन रीस्टार्ट करा.
२. ‘सेटींगमधून अँप्समध्ये जाऊन संशयास्पद अॅप अनइन्स्टॉल करा.
३. फोन सामान्यपणे रीस्टार्ट करा.
अॅक्सेस काढून टाकणे
१. सेटींग्जमधून अॅक्सेसेब्लिटीमध्ये जाऊन संबंधित अॅपचे सर्व परवानगी बंद करावी.
२. सेटींगमधून सिक्युरिटी व त्यानंतर डिव्हाईस अॅडमिन अँप्समध्ये जाऊन अॅपचे अॅडमिन हक्क डिअँक्टिवेट करा.
३. यानंतर अॅप अनइन्स्टॉल करा. तरीही अॅप जात नसल्यास महत्त्वाचा डेटा बॅकअप घेऊन मोबाईल फँक्टरी रीसेट करा.
बचावासाठी पाच नियम
- कोणतेही अॅप केवळ गूगल प्ले स्टाेअर किंवा अधिकृत अॅप स्टोअरवरूनच डाऊनलोड करावे.
– सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी जाहिरात किंवा लिंकवरून एपीके फाईल डाऊनलोड करू नका.
- अनोळखी अॅप्सना कधीही परवानगी देऊ नका.
- मोबाईलमधील गूगल प्ले प्राेटेक्ट नेहमी ऑन ठेवा.
- फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.




