Sunday, November 22, 2026
Homeक्राईमNashik Crime News : 'त्या' औषध व्यावसायिकाचा मृतदेह आढळला; आजारपणाला कंटाळून आत्महत्या...

Nashik Crime News : ‘त्या’ औषध व्यावसायिकाचा मृतदेह आढळला; आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमधील (Nashik) अशोकस्तंभ परिसरातील मानाचा राजा गणपतीच्या दर्शनाचे सांगून दुकानातून बाहेर पडलेले औषध व्यावसायिक मुकेश गोवर्धनदास ओबेराय (वय ४६, रा. समर्थ नगर) यांचा ठाणे येथील खाडीत मृतदेह आढळून आला आहे. १७ सप्टेंबरपासून बेपत्ता असलेल्या ओबेराय यांच्या अपहरणाचा (Kidnapping) गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल होता. शनिवारी (दि. १९) उशिरा त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच शहरात आणि औषध व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक आजारपण आणि त्यातून आलेल्या तीव्र मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १७) सकाळी साडेअकराच्या सुमारास मुकेश ओबेराय गोळे कॉलनीतील त्यांच्या औषधांच्या दुकानात (Shop) आले होते. काही वेळाने त्यांनी दुकानातील कर्मचारी आदित्य पाटेकर याला अशोकस्तंभावर मानाचा राजा गणपतीचे दर्शन घेऊन १० मिनिटांत येतो, असे सांगितले आणि ते बाहेर पडले. मात्र, अनेक तास उलटूनही ते दुकानात किंवा घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या दोन्ही मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांची चिंता वाढली. शोध घेऊनही पत्ता न लागल्याने त्यांचे बंधू मनिष ओबेराय यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली.

त्यावरून सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्य कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. अपहरणाचा गुन्हा दाखल होताच सरकारवाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल (Mobile) लोकेशन आणि संभाव्य प्रवासाच्या मार्गांची तांत्रिक तपासणी सुरू केली. तपासादरम्यान ओबेराय यांचे लोकेशन ठाण्याच्या दिशेने दर्शवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने ठाण्याला रवाना झाले. तेथे ठाणे खाडी परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली असता, तो मुकेश ओबेराय यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

​कौटुंबिक आजारपण आणि चिंता

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, ओबेराय यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून तीव्र आजारपणाची समस्या सुरू होती. घरातील जबाबदाऱ्या, वैद्यकीय उपचारांचा वाढता ताण आणि यामुळे येणारी सततची चिंता यामुळे मुकेश तणावाखाली होते. याच मानसिक विवंचनेतून त्यांनी ठाणे गाठून खाडीत उडी घेत आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

​ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेबाबत ठाणे येथील पोलिस ठाण्यात (Thane Police Station) सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात या घटनेची अधिकृत नोंद केली जात आहे. ओबेराय यांनी नाशिक सोडण्यापासून ते ठाणे खाडीपर्यंत केलेला प्रवास, त्यांची झालेली मनस्थिती आणि आत्महत्येमागचे अचूक कारण स्पष्ट व्हावे यासाठी सरकारवाडा व ठाणे पोलिस संयुक्त तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik हजारो पणत्यांच्या लखलखाटात 'महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून...