Saturday, November 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajasthan Election Results 2026 : राजस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'डबल धमाका';...

Rajasthan Election Results 2026 : राजस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा ‘डबल धमाका’; जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजपला मोठा धक्का

जयपूर | Jaipur

राजस्थानमधील (Rajasthan) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Election) विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर मोठी आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांमुळे राज्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, राज्यात आणि केंद्रात भाजपची (BJP) सत्ता असतानाही ग्रामीण पट्ट्यातून भाजपला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

राजस्थान राज्य निवडणूक आयोगाच्या (Rajasthan State Election Commission) आकडेवारीनुसार, ३७ जिल्ह्यांतील ७,५४३ पंचायत समिती जागांपैकी ७,३९३ जागांचे आणि १,२७५ जिल्हा परिषद जागांपैकी ९८१ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पंचायत समितीच्या ३,७०१ जागांवर काँग्रेसने, तर २,१८१ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेतही काँग्रेसने (Congress) ५९९ जागा जिंकत मोठी आघाडी घेतली असून, भाजपला ३०१ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीवर कुणाचे वर्चस्व?

जिल्हा परिषदेच्या ३७ पैकी २५ ठिकाणी काँग्रेसने आघाडी/विजय मिळवला असून, भाजपला ८ जिल्हा परिषदांवर समाधान मानावे लागले आहे, तर ३ ठिकाणी अपक्ष व अन्य पक्ष पुढे आहेत. मागील वेळी २९ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपने १६ आणि काँग्रेसने १० जागा जिंकल्या होत्या; मात्र यंदा चित्र पालटल्याचे पाहायला मिळत आहे. पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने २१३, भाजपने ८५ आणि अपक्षांनी ५६ जागांवर आघाडी/विजय मिळवल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्येही भाजपला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रमुख जिल्ह्यांचे चित्र काय?

राजस्थानमधील मेवाड आणि मारवाडसह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने भाजपवर निर्णायक आघाडी घेतली आहे. जयपूरमध्ये काँग्रेसने २१६ पंचायत समिती जागा जिंकल्या, तर भाजपला ८७ जागांवर समाधान मानावे लागले. जोधपूरमध्ये काँग्रेसला १९५ आणि भाजपला ८१ जागांवर यश मिळाले. याशिवाय भीलवाडा (काँग्रेस १६५, भाजप १११), बिकानेर (काँग्रेस १५५, भाजप ६५), दौसा (काँग्रेस १३५, भाजप ५९) आणि सीकर (काँग्रेस १७९, भाजप ८७) येथेही काँग्रेसने वर्चस्व गाजवले. पश्चिम राजस्थानमधील बाडमेर (१२० विरुद्ध ६२), जैसलमेर (८९ विरुद्ध ३६) आणि राजसमंद (९७ विरुद्ध ५८) येथेही काँग्रेसने भाजपला मागे टाकले.

भाजपच्या बालेकिल्ल्यांना हादरे

चित्तौडगड, सिरोही, राजसमंद आणि जालोर या भाजपचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या भागांत काँग्रेसने यश मिळवल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, अजमेर आणि उदयपूरमध्ये भाजपने जागा राखण्यात यश मिळवले. पंचायत समिती पातळीवर अजमेर (८३ विरुद्ध ८०), बालोतरा (६३ विरुद्ध ५७), सलूंबर (३८ विरुद्ध ३२) आणि उदयपूर (१४६ विरुद्ध १३७) येथे भाजप पुढे राहिला.

काँग्रेसच्या विजयावर राहुल गांधींची प्रतिक्रिया काय?

या निकालानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजस्थानमधील ग्रामीण मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण राजस्थानमधील जनतेने काँग्रेसवर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून, हा प्रतिसाद भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारला दिलेले उत्तर आहे. मनरेगा (MGNREGA), शेतकऱ्यांचे प्रश्न, पंचायतींचे अधिकार, महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतराच्या मुद्द्यांवर गावांनी आवाज उठवला असून, हा केवळ राजस्थानचा नव्हे तर देशातील प्रत्येक गावाचा आवाज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दुसरीकडे, राजस्थान काँग्रेसनेही या यशाचे स्वागत करत पंचायती राज निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमतासह विजय मिळवल्याचा दावा केला आहे.

ताज्या बातम्या

IND vs NZ 1st Test : वेलिंग्टन कसोटीत भारत मजबूत स्थितीत;...

0
नवी दिल्ली | New Delhi भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या...