
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटी परिसरातील (Panchvati Area) निमाणी बस स्टँडसमोरील आयुष हॉस्पिटलमध्ये (Aayush Hospital) महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घालत डॉक्टरांना मारहाण केली. तसेच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) तोडफोड करून कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयितांविरद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी रत्ना सचिन जैन (वय ३७, रा. पंचवटी) यांच्यावर आयुष हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूबद्दल कळताच नातेवाईक संतप्त झाले. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित सचिन जैन, जितेंद्र पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या ३ ते ४ अनोळखी इसमांनी डॉ. कृष्णा यादव यांच्या बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) कॅबिनमध्ये विनापरवानगी प्रवेश करून आरडाओरड केली. यानंतर थेट अतिदक्षता विभागात शिरुन तेथे कर्तव्यावर असलेले डॉ. अक्षय पाटील आणि डॉ. मिलिंद पाटील यांना हाताने व चापटीने मारहाण केली.
इतक्यावरच न थांबता, रुग्णालयातील कर्मचारी दिपेश दोंदे, दुर्गेश बच्छाव, प्रशांत धुमाळ आणि फिर्यादी आयुष तायडे यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली व त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या गोंधळात अतिदक्षता विभागाची काच फोडून रुग्णालयाच्या (Hospital) मालमत्तेचे नुकसान केले. या घटनेप्रकरणी रुग्णालयातील परिचारक (ब्रदर) आयुष प्रवीण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमासह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व वैद्यकीय संस्था (हिंसाचार व मालमत्तेची हानी नुकसान प्रतिबंध) अधिनियम कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा (Case) दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे तपास करत आहेत.




