नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात रिक्षाभाड्यावरून प्रवाशांची (Passengers) अरेरावी आणि गुंडगिरी वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यासाठी केवळ ५० रुपये प्रति सीट भाडे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन अनोळखी प्रवाशांनी रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्ह्याची (Case) नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, रितेश भगवान मराठे (वय २४, रा. पवन नगर, सिडको) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी (दि. १७) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास रितेश हे त्यांचा भाचा हर्षल सुधीर माने याच्यासह ठक्कर बाजार येथून प्रवासी घेऊन गडकरी चौकाकडे आले होते. प्रवाशांना सोडून ते घराकडे परतत असताना, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुची हॉटेलसमोर दोन अनोळखी व्यक्तिंनी हात दाखवून त्यांची रिक्षा थांबवली.
संशयितांनी त्यांच्याजवळील सामानासह वडाळा नाका येथे सोडण्याची मागणी केली. त्यावर रिक्षाचालक रितेश यांनी प्रति सीट ५० रुपये भाडे होईल, असे सांगितले. हा आकडा ऐकताच संशयितांना अनावर राग आला. त्यांनी रितेश यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली आणि काही क्षणातच वाद विकोपाला गेला. शिवीगाळ करत संशयितांनी मारहाण सुरू केली. यादरम्यान, त्यातील एकाने रस्त्यावरील दगड उचलून थेट रितेश यांच्या डोक्यात मारला. या अचानक झालेल्या हल्ल्यात रितेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.
पोलिसांत गुन्हा दाखल
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रितेश व त्यांच्या भाच्याने प्रसंगावधान राखत तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली, तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी थेट मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. रितेश मराठे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही अज्ञात संशयितांविरोधात मारहाण आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांना अशा प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याने चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.




