Friday, November 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News : संशयास्पद फाईल उघडणे पडले महागात; हॉटेल व्यावसायिकाला ४.४५...

Nashik Crime News : संशयास्पद फाईल उघडणे पडले महागात; हॉटेल व्यावसायिकाला ४.४५ लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) चलनाच्य नावाने मोबाईलवर एपीके फाईल पाठवून सायबर भामट्यांनी (Cyber Fraud) हॉटेल व्यावसायिकाच्या बँक खात्यांवर डल्ला मारल्याची घटना टागोरनगर येथे उघडकीस आली आहे. या फसवणुकीत व्यावसायिकाच्या एचडीएफसी बँकेतील दोन खात्यांतून तब्बल ४ लाख ४५ हजार ३२९ रुपये परस्पर काढून घेण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पुरुषोत्तम नारायण शेट्टी (४९, रा. टागोरनगर, नाशिक) असे फसवणूक झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. २ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून आरटीओ चलन या नावाने एपीके फाईल (APK File) पाठवण्यात आली होती. आरटीओकडून आलेली फाईल असल्याचे समजून त्यांनी ती उघडली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांतून परस्पर व्यवहार झाल्याचे समोर आले.

शेट्टी यांच्या एचडीएफसी बँकेच्या पहिल्या खात्यातून ६८ हजार ९०१, ७५ हजार ४८० आणि ९८ हजार रुपये, असे एकूण २ लाख ४२ हजार ३८१ रुपये काढण्यात आले. तर दुसऱ्या खात्यातून ६० हजार ४५५, ६२ हजार ४९३ आणि ८० हजार रुपये, असे एकूण २ लाख २ हजार ९४८ रुपये अनोळखी खात्यांमध्ये वर्ग झाले. अशा प्रकारे दोन्ही खात्यांतून एकूण ४ लाख ४५ हजार ३२९ रुपयांची फसवणूक झाली.

खात्यातील रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात येताच शेट्टी यांनी तातडीने गंगापूर रोड (Gangapur Road) येथील सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रार पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे करीत आहेत.

एपीके फाईलपासून सावध राहण्याचे आवाहन

आरटीओ चलन, बँक व्यवहार किंवा अन्य शासकीय सेवांच्या नावाने मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी एपीके फाईल डाउनलोड करू नयेत. अशा फाईलच्या माध्यमातून मोबाईलमधील माहिती आणि बँक खात्यांशी संबंधित तपशील सायबर भामट्यांच्या हाती लागण्याची शक्यता असते. त्यामुळे अनोळखी लिंक किंवा फाईल उघडण्यापूर्वी खातरजमा करावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Crime News : विद्यार्थिनीचा विनयभंग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अल्पवयीन विद्यार्थिनीशी फोनवर अश्लील संभाषण करून तिचे आक्षेपार्ह फोटो मिळविणे, तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचा छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात...