अंबासन | वार्ताहर | Ambasan
कर्जबाजारीपणा, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दरांच्या विवंचनेत अडकलेल्या बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) राहुड (Rahud) येथील शेतकऱ्याने (Farmer) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गुलाब केशव निकम (५९) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने राहुडसह काटवन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुलाब निकम हे सुमारे तीन एकर शेती कसून पत्नी व तीन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीच्या उत्पन्नावरच संसाराचा गाडा हाकणाऱ्या निकम यांच्यावर घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातच बदलत्या हवामानामुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. यंदाच्या हंगामात त्यांनी कांदा पिकाची (Onion Crops) लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला.
उरलेला कांदा बाजारात (Onion Market) विकला असता त्याला मातीमोल भाव मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. नातेवाईकांकडून घेतलेले हातउसने पैसे कसे फेडायचे, घरखर्च कसा चालवायचा आणि तीन मुलांचे विवाह कसे उरकायचे, या चिंतेने ते सतत विवंचनेत राहत होते. वाढते कर्ज आणि अपुरे उत्पन्न यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जनावरांना चारा टाकण्यासाठी ते काल गावाशेजारील खळ्यात गेले होते. रात्री ते शेतातच थांबले होते मात्र सकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुलगा चेतन निकम हा खळ्याकडे गेला असता वडिलांनी गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनसमितीचे अध्यक्ष अशोक ठाकरे यांनी तातडीने जायखेडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच महसूल विभागाचे तलाठी विष्णु गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.




