Thursday, May 7, 2026
Homeक्राईमNashik Crime News: फर्नांडिसवाडीत टोळीयुध्दाचा भडका

Nashik Crime News: फर्नांडिसवाडीत टोळीयुध्दाचा भडका

हफ्ता वसुली, वर्चस्वासाठी भरचौकात गोळीबार; नागरिक भयभीत

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकरोडच्या फर्नांडिसवाडी परिसरात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी बेद व उज्जैनवाल टोळीच्या गटात वारंवार उद्भवणाऱ्या टोळीयुद्धाचा भडका पुन्हा पहाटे उडाला. दोन्ही गटाने भरचौकात एकमेकांवर आणि हवेत नऊ राऊंड फायर करून दहशत माजवली. त्यामुळे या गटांचे उघडउघड भांडणे स्थानिकांच्या जीवावर बेतण्याची भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी बीएनएस कलमांसह आर्म अॅक्ट कायद्यान्वये पंधरा जणांवर गुन्हा नोंदवला असून सहा जणांना अटक करून कार व दोन गावठी कट्टे हस्तगत केले आहेत.

टक्या ऊर्फ सनी रावसाहेब पगारे, इर्शाद चौधरी, बारक्या ऊर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे, राहुल उज्जैनवाल, रोहित गोविंद डिंगम ऊर्फ माले व दोन्ही गटातील दहा अनोळखी संशयित (सर्व रा. फर्नांडिसवाडी, उपनगर) अशी सराईत संशयितांची नावे आहेत. जयभवानी रोडवरील बेद व उज्जैनवाल टोळीत गेल्या बारा वर्षांपासून आपापसात भांडणे विवाद आहेत.

- Advertisement -

दोन्ही टोळ्यांतील सराईत, त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे उपनगर, नाशिकरोड, मालधक्का, बिटको, फर्नांडिसवाडी, जयभवानी रोडसह इतर भागात अवैधरीत्या खंडणी आणि हप्ते वसुली करतात. त्यामुळे दोन्ही टोळ्यांच्या जाचाला स्थानिक नागरिक व व्यावसायिक वैतागले असून कठोर कारवाया करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही टोळ्यांचे सदस्य तुरुंगातून जामिनावर बाहेर आहेत. त्यानुसार आता त्यांनी परिसरात दहशत व वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ‘स्टंट’ सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग पहात दोन वाजता दोन्ही टोळ्यानी एकमेकांवर गावठी कट्टयांतून गोळीबार केला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसून नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे या टोळ्यांवर पुन्हा एकदा कठोर कारवाईची मागणी पुढे येऊ लागली आहे.

दरम्यान, गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व पथकाने तपासात जेलरोडवरील के रू पाटील नगरातून संशयित इर्शाद मोहम्मद अली चौधरी (२९, रा.एव्हर स्विट अपार्टमेंट, रजा कॉलनी, देवळाली गाव) याला स्विफ्ट कार (एमएच १५ डीसी ७०९९), दोन देशी पिस्टल व कट्ट्यासह अटक केली. त्याने गोळीबार केल्याचे उघड झाले आहे.

सुमोटो कारवाई
रात्री दोन वाजता फर्नांडिसवाडीत गोळीबार आणि तणाव वाढला. दोन्ही गट आमनेसामने आले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून हत्यारे घेऊन एकमेकांविरोधात हप्ता वसूल करण्यातून वाद सुरू केले. तेव्हा डायल ११२ वर इमर्जन्सी कॉल झाला. तेव्हा उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ, डीबीचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व पथक दाखल झाले. पोलीस दाखल होण्यापूर्वीच संशयित पसार झाले. पोलिसांनी पाहणी केली असता, घटनास्थळी सहा ते सात पुंगळ्या आढळून आल्या. त्या जप्त करून एफएसएलकडे पाठवल्या आहेत. दरम्यान, उपनिरीक्षक सोनवणे यांनी सरकार पक्षाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही गटांतील संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

राहुलचे वकीलपत्र घेणाऱ्या काकूचे घर फोडले
संशयित राहुल उज्जैनवाल याचे नेहमीच वकीलपत्र घेणाऱ्या त्याच्या काकू अॅड. जस्लीन चहल यांच्या घरावर बेद गँगचा सदस्य रोहित डिंगम याने व साथीदारांनी मध्यरात्री दगडफेक करून नुकसान केले. घरावर मद्याच्या बाटल्या फेकल्या. त्यामुळे परिसरात भीती पसरली. पोलिसांच्या माहितीनुसार, डिंगमने राहुल उज्जैनवाल यास ‘ये राहुल्या हा माझा एरिया आहे. इकडे यायचे नाही’. त्यावर उज्जैनवालने डिंगमला ‘ए माल्या तू इकडे यायचे नाही’ असा दम भरला. तेव्हा डिंगमने राहुलला उद्देशून या एरियाचा भाई फक्त मी आहे, येथे माझीच मुले हप्ते गोळा करणार, अशी दर्पोक्ती केली. त्यानंतर गोळीबार झाला. यानंतर डिंगमसह साथीदार जस्लीनच्या घराजवळ आले व त्यांनी दगड, बिअरच्या बाटल्या फेकत चारचाकी वाहनांमध्ये बसून पळ काढला.

पोलीस आहेत की नाही ?
बेद व उज्जैनवाल टोळी बाहेर आल्याने पोलिसांसह सामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच भरचौकात दोन टोळ्या एकत्र येऊन गोळीबार करत असल्याने पोलिसांचा धाक संपुष्टात आल्यासह पेट्रोलिंग, रात्र गस्त व स्टॉप अँण्ड सर्च कारवाया फोल ठरल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. आतातरी हे टोळके वठणीवर आणावे, असे म्हणण्याची वेळ आल्याचे स्थानिकांनी बोलून दाखवले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि...