नाशिक | प्रतिनिधी | Nashik
श्रावण महिना, ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सव या सण-उत्सवांच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सार्वजनिक शांतता राखली जावी, यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाकडून (Nashik City Police Commissionerate) गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशानुसार ७ पोलिस ठाण्यांमधील ४६ सराईत गुन्हेगारांना २ वर्षांसाठी नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
गेल्या तीन महिन्यांत परिमंडळ १ च्या अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी, डीबी पथके आणि सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मदतीने विशेष आढावा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या आणि गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवणाऱ्या सराईतांचा समावेश आहे. तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी आणि घरझडती घेण्यासाठी पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या (Crime Branch) विशेष पथकांना पाचारण करण्यात आले आहे. हे संशयित नाशिकमध्ये (Nashik) बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्यास त्यांना ताब्यात घेतले जाईल. तसेच, अजूनही काही सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव चौकशीत असून, येत्या काही दिवसांत त्यांच्यावरही हद्दपारीचे आदेश काढले जाणार आहेत.
तडीपार संशयितांचा नावे व पत्ता
सुमित महाले, अजय कुंदे, उदय जगताप, किरण भडांगे, संदीप आहिरे, गौरव थोरात, ऋषीकेश परसे, शुभम बनकर, विकास हेमके, विकी जाधव, जयेश दिवे, किरण शेळके, विकी ठाकूर, जनार्दन बोडके, किरण क्षिरसागर, गाैरव गांगुर्डे, अविनाश रणदिवे, प्रमोद चारोस्कर, विकी नेटावटे, बाबा गांगुर्डे, हर्षल वनवे, रितेश चव्हाण, आदित्य पिंगळे, अमोल फल्ले, कमलेश सुराणा, रिंकेश सोळंकी, प्रिन्स सहाणी, सूरज पवार, रोशन कटारे, आकाश गांगुर्डे, मयुर पारचे उर्फ उज्जैनवाल, मयुर कदम, जिब्रान शेख, लखन काशिद, नवाज शेख, आसिफ कोकणी, वसीम शेख, नवाज खान, अशाेक पंजारे, शिवाजी गांगुर्डे, महेश कटारीया, सुनिल गायकवाड, किसन परदेश, गौरव जाधव, राहुल जाधव, समीर गुंजाळ
पोलिस ठाणेनिहाय तडीपार गुन्हेगारांची आकडेवारी
पंचवटी पोलिस ठाणे: १९
म्हसरूळ पोलिस ठाणे: ९
गंगापूर पोलिस ठाणे: ७
भद्रकाली पोलिस ठाणे: ६
आडगाव पोलिस ठाणे: २
मुंबई नाका पोलिस ठाणे: २
सरकारवाडा पोलिस ठाणे: १
(एकूण – ४६ गुन्हेगार)




