नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील हिरावाडी परिसरातील (Hirawadi Area) समृद्धी ज्वेलर्सवर (Samruddhi Jewellers) पडलेला सशस्त्र दरोडा हा कुठल्या नवख्या टोळीने नव्हे, तर आंतरराज्य व सराईत गुन्हेगारांनी टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बंदुकीचा धाक दाखवून अवघ्या दीड मिनिटात दुकान लुटणाऱ्या या टोळीचा मुख्य मनसुबा दुकानचालक महिला नैना पगारिया यांच्या धैर्यामुळे आणि प्रतिकारामुळे पूर्णपणे फसला. दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला करूनही पगारिया यांनी निकराचा विरोध केल्याने अखेर चोरट्यांना दुकान लुटता आले नाही आणि तिथून काढता पाय घ्यावा लागल्याचे तपासात समोर आले आहे.
शुक्रवारी (दि. १५) रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी समृद्धी ज्वेलर्सवर गावठी कट्टा आणि एअरगनचा धाक दाखवत दरोडा (Robbery) टाकला होता. प्राथमिक तपासानुसार या टोळीने घटनेच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपासूनच ज्वेलर्सच्या अवतीभवती रेकी केली होती. दुकानात ग्राहक नसून केवळ दोन महिला व एक पुरुष कर्मचारी हजर असल्याची खात्री पटताच चौघांनी तोंडाला मास्क, रुमाल व स्पोर्ट्स कॅप घालून थेट आत प्रवेश केला तर दोघे जण दुचाकीवर बसून बाहेर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. चोरट्यांनी आत शिरताच सोन्याच्या दागिन्यांचे ट्रे अस्ताव्यस्त करून लुटमार सुरू केली.
त्याचवेळी सेल्समन अमित श्रीश्रीमाळ यांनी पिस्तूलधारी चोरट्याशी थेट दोन हात करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने अमित यांच्या डोक्यात पिस्तूलच्या जड ग्रीपने प्रहार केला. परंतु, या प्रसंगातही मुख्य दुकानचालक (Shop Owner) नैना पगारिया डगमगल्या नाहीत. त्यांनी दरोडेखोरांना थेट अंगावर धावून जात प्रचंड विरोध केला. चोरट्याने त्यांच्यावरही ७ ते ८ वेळा ग्रीपने जीवघेणा हल्ला चढवला, त्यात त्या जखमी झाल्या. मात्र, पगारिया यांच्या या अनपेक्षित प्रतिकारामुळे दरोडेखोरांची दाणादाण उडाली. संपूर्ण दुकान साफ करण्याचा त्यांचा डाव उलटला आणि भीतीपोटी त्यांना पळ काढावा लागला.
तपासाची चक्रे फिरली
घटनेची गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत व गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील व निरीक्षक सुनील पवार यांच्या सूचनेने गुन्हेशाखेने तपास सुरू केला आहे. संशयित है परप्रांतीय आणि सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले असून ते हिंदी व मराठीमिश्रित भाषेत बोलत होते. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या वर्णनावरून चौघांचे स्केच (रेखाचित्रे) तयार केले असून, संशयितांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची चार विशेष पथके मुंबई, इंदूर (मध्य प्रदेश), अहिल्यानगर, धुळे व मालेगावच्या दिशेने रवाना झाली आहेत.





