नाशिक | Nashik
नेहमीच संशयास्पद कारभाराच्या आरोपांमुळे चर्चेत असणाऱ्या दिंडोरी रोडवरील (Dindori Road) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून (एमयूएचएस) फसवणुकीचा कारनामा समोर आला आहे. विद्यापीठात क्लर्क (लिपिक) पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गंगापूर रोडवरील सुशिक्षित तरुणाला तब्बल आठ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील मुख्य संशयित अनंत काशिनाथ सोनवणे हा स्वतः विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव पदावरुन निवृत्त झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यासह तीन संशयितांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथील रहिवासी वर्षा राजेंद्र शिनकर (५०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सन २०२३ पासून हा फसवणुकीचा खेळ सुरू होता. विद्यापीठात कार्यरत संशयित अनंत काशिनाथ सोनवणे याच्यासह खासगी एजंट देवीदास शरद ढोमसे (रा. सैलानी बाबा स्टॉपजवळ, जेलरोड) आणि विनोद दिवे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, जेलरोड) यांनी संगनमत करून शिनकर कुटुंबाचा विश्वास संपादन केला. सोनवणे हा स्वतः विद्यापीठात मोठ्या पदावर कार्यरत असल्याने शिनकर यांचा त्याच्यावर सहज विश्वास बसला. संशयितांनी सौ. शिनकर यांचा मुलगा शुभम याला विद्यापीठात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकूण आठ लाख रुपयांची मागणी केली.
त्यानुसार शिनकर यांनी कॅनडा कॉर्नर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून (Bank of India) ३ लाख रुपये बँक खात्यामार्फत ट्रान्सफर केले, तर ५ लाख रुपये संशयितांना रोख स्वरूपात दिले. लाखो रुपये पदरात पाडून घेतल्यानंतरही संशयितांनी शुभम याला नोकरी लावून दिली नाही, तसेच विद्यापीठात कोणतीही प्रक्रिया केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिनकर यांनी संशयितांकडे पैसे (Money) परत मागितले, तेव्हा संशयितांनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
सरकारवाडा पोलिसांत गुन्हा
सौ. शिनकर यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी २ जुलै रोजी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठोके करत आहेत. मुख्य संशयित स्वतः विद्यापीठात कार्यरत असल्याने, या रॅकेटमध्ये विद्यापीठातील आणखी काही मोठे मासे किंवा अंतर्गत कर्मचारी सामील आहेत का? तसेच या टोळीने आजवर आणखी किती सुशिक्षित तरुणांना अशा प्रकारे फसवले आहे, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. संशयितांची शोध सुरु आहे.
इमेज डागाळली!
दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कारभार आधीच अनेकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर विद्यापीठातील अधिकृत सरकारी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच नोकरीचे दुकान मांडून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने विद्यापीठाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाईमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे.




