त्र्यंबकेश्वर| Trimbakeshar
तालुक्यातील सापगाव (Sapgaon) येथील एका १८ वर्षीय तरुणाची बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून भावाने धारदार चाकूने भोसकून निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना (दि.५) रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. आर्यत (आर्यन) सोमनाथ कांबळे (वय १८, रा. सापगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) संशयित आरोपी आदित्य एकनाथ मोंढे (रा. शिरसगाव) याला अटक केली आहे.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार मृत आर्यत कांबळे याचे संशयित आरोपी आदित्य मोंढे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच प्रेमप्रकरणाचा (Love Affair) तीव्र राग आदित्यच्या मनात होता. गुरुवारी (दि.५) रोजी रात्री ९ च्या सुमारास ‘आपल्यात निर्माण झालेला वाद समजावून सांगतो’ असे म्हणत आदित्यने आर्यतला भेटण्यासाठी बोलाविले. त्यानंतर दोघांची सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्गावरील स्मशानभूमीजवळ भेट झाली. तेथे त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आदित्यने सोबत आणलेल्या धारदार चाकूने आर्यतच्या पोटात डाव्या बाजूला, गळ्यावर, छातीवर व हातावर जबर वार केले.
जे करायचे ते केले… असे म्हणत संशयित निघून गेला
आर्यतवर अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे त्याने मदतीसाठी मोठा आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून जवळच थांबलेले त्याचे सोबती व चुलतभाऊ रोशन कांबळे तातडीने घटनास्थळाकडे धावले. मात्र, “आपण जे करायचे ते केले आहे,” असे म्हणत संशयित आदित्य तेथून पसार झाला. तर गंभीर जखमी झालेल्या आर्यतला रक्ताच्या थारोळ्यातून तातडीने उपचारासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात (Trimbakeshwar Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
गुन्हा दाखल,संशयिताला अटक
दरम्यान या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबियांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) धाव घेतली. मृत आर्यतचा चुलतभाऊ रोशन पप्पू कांबळे याने दिलेल्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलीसांनी संशयित आरोपी आदित्य मोंढे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
फेरीमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सदरची घटना ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर घडली असून, या घटनेमुळे भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या फेरीमार्गावर नेहमीच भाविकांची (Devotees) ये-जा असते. याच फेरीमार्गावर चाकू हल्ला होऊन तरुणाणी हत्या झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.




