नाशिक | Nashik
अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) दाखल असलेल्या ‘मकोका’ गुन्ह्यातील एका संशयिताने (Suspected) जेलच्या बरैकमध्येच दुसऱ्या सहसंशयितास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोऱ्या कागदावर जबरदस्तीने स्वाक्षरी (सही) घेऊन त्याचा न्यायालयात गैरवापर केल्याची फिर्याद नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सराईत गुंड महेश गोकुळ सोनवणे उर्फ चिमण्या (वय २३, रा. सध्या त्रिमूर्ती चौक, सिडको, मूळ रा. सातपूर) याने संशयित संशयित हर्षद पाटणकर आणि दीपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी व सराईत गुंड महेश सोनवणे उर्फ चिमण्या याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंद आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. १० जून २०२६ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने महेशचा जामीन (Bail) मंजूर केल्याने तो कारागृहातून बाहेर आला होता. दरम्यान, ३१ जानेवारी रोजी अटक झाल्यानंतर त्याची एकदा पोलीस कोठडी घेण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर २८ एप्रिल २०२६ रोजी त्याला पुन्हा नाशिकरोड जेलमध्ये पाठवण्यात आले.
तेथे गेल्यानंतर त्याच गुन्ह्यातील दुसरा मुख्य संशयित हर्षद पाटणकर (Harshad Patankar) याने महेशला गाठून धमकावण्यास सुरुवात केली. तू अंबडच्या गुन्ह्यात माझ्याविरुद्ध मोक्का (मकोका) लावण्यासाठी जबाब का दिलास? तू माझ्याशी मोठा पंगा घेतला आहेस, मी तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून जेलमध्ये महेशला वेळोवेळी मानसिक त्रास दिला व घाबरवून सोडले. याच दहशतीचा गैरफायदा घेऊन पाटणकर आणि लोंढे यांनी महेशला जीवे मारण्याची धमकी देत कोऱ्या कागदावर त्याची जबरदस्तीने सही घेतली. संशयित व चिमण्या हे एकमेकांचे खास मित्र आहेत. तर, आता पाटणकर व दीपक लोंढेला लवकरच अटक केली जाणार आहे.
कारवाईमुळे बिंग फुटले!
१५ जून २०२६ रोजी महेशला एका चॅप्टर कारवाईच्या संदर्भात अंबडला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोलावले होते. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महेशसमोर त्याच्याच नावाचा आणि स्वाक्षरी असलेला एक अर्ज ठेवला, जो जेलमधून पाठवण्यात आला होता. तो अर्ज वाचताच महेशला धक्का बसला. अर्जावरील हस्ताक्षर आपले नसून हर्षद पाटणकर, दीपक लोंढे किंवा इतर कोणाचे तरी असल्याचे महेशच्या लक्षात आले. संशयितांनी त्या कोऱ्या कागदावर स्वतःच्या फायद्याचा खोटा मजकूर लिहून पोलिसांची आणि प्रशासनाची फसवणूक करण्यासाठी तो अर्ज सादर केला होता. फसवणूक झाल्याचे समजताच चिमण्याने नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.




