नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पत्नीला आत्महत्येस (Suicide Case) प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि वैद्यकीय अहवालात फेरफार करून ‘हत्या’ लपविल्याच्या संशयावरून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचा मानसोपचार विभागप्रमुख डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना (Police) यश आले आहे.
नाशिक जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत तब्बल १९३ दिवस कायद्याची पळवाट शोधणाऱ्या डॉ. जेजुरकरचा अटकपूर्व जामीन अर्ज १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत नाशिक शहराच्या (Nashik City) गुन्हे शाखा युनिट एकने १ शुक्रवारी (दि. १८) त्याला बेड्या ठोकल्या आहेत. गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजुरकर (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची बहिण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती डॉ. नीलेश हा २०२१ पासून एका त्रयस्थ डॉक्टर महिलेच्या सांगण्यावरून पत्नीकडे दुर्लक्ष करून त्यांचा सतत मानसिक छळ करत होता, असे फिर्यादीत नमूद आहे. तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये डॉ. नीलेशच्या डॉक्टर मैत्रिणीने डॉ. मनीषा यांना फोन करून, तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस, तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे, अशा हीन शब्दांत मानसिक त्रास दिला होता. या कौटुंबिक कलहाला कंटाळून डॉ. मनीषा यांनी आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सरकारी वकील व तक्रारदाराच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेच्या ठिकाणच्या छायाचित्रानुसार, खिडकीला दोरी बांधून आत्महत्या करणे भौतिकदृष्ट्या अशक्य वाटते. मृतदेहाचे (Dead Body) पोस्ट-मॉर्टम जिल्हा रुग्णालयातच झाले. मात्र नीलेश स्वतः याच रुग्णालयात (Hospital) कार्यरत होता. त्यामुळे पदाचा गैरवापर करून ‘पोस्ट-मॉर्टम’ अहवालात फेरफार करण्यात आला असून, ही आत्महत्या नसून हत्या असावी, असा संशय न्यायालयात व्यक्त करण्यात आला आहे.
स्वत:वरही नैराश्याचे उपचार
मानसोपचारतज्ज्ञ असलेला डॉ. नीलेश आणि त्याची मृत पत्नी डॉ. मनीषा हे दोघेही स्वतः नैराश्यावर उपचार घेत होते, ही बाबही तपासात समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर गुन्हे शाखेने डॉ. नीलेशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, रात्री उशिरापर्यंत अटकेची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात वैद्यकीय अहवालातील फेरफार आणि हत्येचा संशय या नवीन अँगलने पोलीस तपास करत आहेत.
१९३ दिवसांचा असा चालला थरार
६ मार्च २०२६ : डॉ. मनीषा जेजुरकर यांची घरी आत्महत्या.
९ मार्च २०२६ : गुन्हा दाखल होताच डॉ. नीलेश नाशिकमधून फरार.
१७ मार्च २०२६ : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व फेटाळला.
उच्च न्यायालयाची पायरी व सेवेत रुजू : उच्च न्यायालयात अर्ज करताच डॉ. नीलेश पुन्हा शासकीय सेवेत रुजू झाला.
१० सप्टेंबर २०२६ : मुंबई उच्च न्यायालयाने हत्येचा संशय व्यक्त करत जामीन नाकारला.
१७ सप्टेंबर २०२६ : सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अंतिम टप्प्यात फेटाळला.
१८ सप्टेंबर २०२६ : गुन्हे शाखेकडून डॉ. नीलेशला अटक.




