पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
चारित्र्याच्या संशयावरून संशयित (Suspected) आरोपी आकाश सुरेश जाधव (३२) यांनी गुरुवारी (दि. १९) पत्नी पूजा आकाश जाधव (३०) हिची पेठ रोडवरील कोमल सोसायटी परिसरात हत्या केल्यानंतर स्वतःहून म्हसरूळ पोलिस ठाण्यात (Mhasrul Police Station) हजर झाल्याची माहिती आहे. मोबाईल मागितल्यानंतर तो देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर येत आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि पूजा यांचा विवाह २०१५ मध्ये बिहार येथे झाला होता. आकाश वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता, तर पूजा नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होती. ती महिन्याला सुमारे ३० हजार रुपये कमवत होती. दरम्यान, आकाशला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वारंवार वाद घालत असे. या वादातून तिला मारहाणही केली जात होती.
पूजाची बहीण सुधा यादव हिने दिलेल्या फिर्यादीतून संशयिताच्या पूर्वीच्या वर्तनाची माहिती समोर आली आहे. जून २०२६ मध्ये सुधा काही काळ बहिणीकडे राहण्यासाठी आली असताना आकाशने तिच्यासमोरच पूजाला मारहाण केली होती. तसेच, ‘तुला एखाद्या दिवशी मारून टाकेन,’ अशी धमकीही दिली होती. दारूसाठी तो सुधाकडेही पैशांची मागणी करत असे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिलाही घरातून निघून जाण्यास सांगितले होते.
गुरुवारी सकाळी पूजाचा चुलत भाऊ शशीकुमार यादव याने सुधाला फोन करून आकाशने पूजाचा गळा दाबून खून (Murder) केल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच सुधा तातडीने बहिणीच्या (Sister) घरी पोहोचली. घरातील बेडरूममध्ये पूजा गादीवर निपचित पडलेली आढळली. तिच्या नाकाजवळ बोट नेले असता श्वास सुरू नसल्याचे जाणवले. तसेच, तिच्या गळ्यावर नखांच्या खुणा दिसून आल्या.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल डहाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी आहिरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) पाठविण्यात आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिस (Police) पुढील तपास करीत आहेत.




