नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बनावट राजपत्रात नावनोंदणी करून आधारकार्डमध्ये (Aadhar Card) बदल करत बनावट व्यक्ती उभा करून भूखंडाची विक्री करणाऱ्या बंटी-बबली वकिलांसह आठ संशयितांच्या इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) मुसक्या आवळल्या.
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर येथील संतोष संजीवा हेगडे यांच्या मालकीचा प्लॉट आणि वडाळागाव शिवारातील सुधीर जमनादास गुजराथी यांच्या मालकीचा प्लॉट हे भूखंड मूळ मालकांच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून बनावट व्यक्तीच्या आधारकार्डमध्ये बदल करून त्यांच्या जागी मूळ मालकाचे नाव व पत्ता टाकून आधारकार्ड अपडेट करून त्याआधारे बनावट बैंक खाते उघडले.
दरम्यान, सदरहू भूखंड (Plot Land) हे दुसऱ्या व्यक्तीस रजिस्टर खताद्वारे विक्री करून मूळ मालकाची व विकत घेणाऱ्या व्यक्तींची अशी दुहेरी फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Indiranagar Police Station) दाखल करण्यात आला होता.
कुणाला घेतले ताब्यात?
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक संतोष फुंदे यांनी करत वकील कपिल अरविंद पाठक (३८, रा.ए-३, रिकोन एम्पिरिया अपार्टमेंट, खोडेनगर, वडाळा शिवार, नाशिक), वकील अल्मास करीम सय्यद (३३, रा.ए-३, रिकोन एम्पिरिया अपार्टमेंट, खोडेनगर, बडाळा शिवार, नाशिक), रितेश रमेश संसारे (४६, धंदा-व्यवसाय, रा. वडगाव पंगू, ता. जि. नाशिक), संतोष संजीवा हेगडे (बनावट नाव) (मूळ नाव घनश्याम गजाराम गिल, ६५, व्यवसाय रिक्षाचालक, रा. संडे बाजार, एमएससी ऑफिसजवळ, छावणी परिषद, देवळाली कॅम्प, नाशिक), ज्योती संतोष हेगडे (बनावट नाव) (मूळ नाव शोभा शंकर मुकणे, ६३, व्यवसाय मजुरी, रा. ४५६, लॅमरोड, नागझिरा दर्गाजवळ, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक), भीमराव कोंडीबा वाघमारे (४४, रा. फ्लॅट नं.०८, यशविहार, पवननगर, नवीन नाशिक) (मूळगाव गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), मुकेश प्रकाश जाधव (३८, व्यवसाय जमीन खरेद-विक्री एजंट, रा. सामंत भवन रो हाऊस नं. ०४, समर्थनगर, सिंहस्थनगर, नवीन नाशिक), रवींद्र हरिदास अडागळे (४७, रा. २०१, संजय गांधीनगर, आनंदरोड, देवळाली कॅम्प, नाशिक) यांना ताब्यात घेतले.
अशी करायचे फसवणूक
व्यवसायाने वकील असलेले कपिल पाठक व अल्मास करीम सय्यद हे दोन्ही बंटी-बबली बनावट राजपत्रावर मूळ मालकाचे नाव बनावट व्यक्तीच्या मूळ नावाऐवजी नोंद केल्यानंतर आधारकार्ड अपडेट करून घ्यायचे. अपडेट झालेले आधारकार्ड हे उपनिबंधक कार्यालयात खरेदीकरता वापरून बनावट मालक उभा करून त्यांनीच आणलेला व्यक्ती ज्याला याबाबत काहीही कल्पना नसायची त्याच्या खऱ्या नावावर प्लॉट खरेदी करायचा. त्यानंतर बाजारभावाप्रमाणे थोडीफार तडजोड करून विकायचा, यामध्ये मूळ जागामालकासह खरेदी करणाऱ्या व्यक्तीचीदेखील कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली.
पोलिसांचे आवाहन
अशाप्रकारे कोणाची फसवणूक करून भूखंड घोटाळा झाला असल्यास त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे अथवा संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी केले आहे.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ-२ किशोर काळे, सहायक आयुक्त अंबड विभाग सचिन बारी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सहायक पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक संतोष फुंदे, हवालदार पवन परदेशी, अमजद पटेल, सागर परदेशी, कुलदीप पवार, अमलदार योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभमाळी, वाल्मीक पाटील, राहुल धोंगडे, प्रमोद कासुदे, दीपक शिंदे, श्यामल जोशी यांनी केली.
याची जबाबदारी कोणाची?
फक्त आधारकार्डचा वापर करून प्लॉटची खरेदी होते. मग यामध्ये फसवणूक झाल्यास शासन, तलाठी, मंडल अधिकारी, सबरजिस्टार यापैकी कोण जबाबदार आहे. असा सवाल सदरहू गुन्ह्याच्या निमित्ताने समोर आला आहे.




