नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) नाशिक एसआयटीने (Nashik SIT) शुक्रवारी(दि. २४) जळगावचे तत्कालिन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगाेणीकर याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता या रॅकेटची पाळेमुळे तत्कालिन शिक्षण उपसंचालक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. या घोटाळ्यात निष्पन्न झालेल्या ८४१ बोगस मान्यतांपैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात तब्बल ६३८ (७५ टक्के) शालार्थ आयडी तयार करण्यात आले आहेत. यावरून हिंगोणीकर याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसे ‘मॅनेज’ केले आणि कोट्यवधींचे ‘लक्ष्मीदर्शन’ घडवून हा घाेटाळा कसा शिजवला, याचा तपास आता पोलिसांच्या केंद्रस्थानी आला आहे.
हिंगोणीकर याने २८ ऑगस्ट २०११ ते ३ जून २०१५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात कार्यरत असताना स्वतःच्या स्वाक्षरीने तब्बल २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता दिल्याचे दाखवले होते. धक्कादायक म्हणजे, कोणत्याही संस्थाचालक किंवा मुख्याध्यापकाने या मान्यतांसाठी नियमाप्रमाणे अर्ज अथवा प्रस्ताव सादर केले नव्हते. केवळ आर्थिक व्यवहार करून मागील तारखांचे (बॅक डेटेड) बनावट (Bogus) मान्यता आदेश आणि शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
हे देखील वाचा : Shalarth ID Scam : कवितेत ‘ऋतूपर्व’, प्रत्यक्षात फसवणुकीचे पर्व! माजी शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांचा दुहेरी पर्दाफाश
जळगावच्या (Jalgaon) ६३८ प्रकरणांची झाडाझडती घेतली असता तब्बल ११६ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कोणतेही मूळ दस्तऐवज शालार्थ प्रणालीवर अपलोड केलेले आढळलेले नाहीत! कागदपत्रांचा पत्ता नसतानाही या बोगस कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देवून शासनाच्या तिजोरीतून थकबाकी आणि पगारापोटी कोट्यवधी रुपये अदा करण्यात आले. हे बनावट आदेश नक्की कुठे तयार झाले? संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांकडून या कामासाठी किती लाखांची ‘रक्कम’ घेतली गेली? आणि यात शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कोणाकोणाचा वाटा होता? याची चौकशी आता एसआयटी करत आहे.
संघटित गुन्हेगारी कलम
शिक्षणाधिकारी कार्यालयापासून ते थेट उपसंचालक कार्यालयातील बडे अधिकारी, कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि दलाल (एजंट) यांनी संघटितपणे हा घाेटाळा केल्याचे निष्पन्न हाेत आहे. शासनाची १६० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करून पात्र शिक्षकांच्या हक्कावर गदा आणल्याने पोलिसांनी या गुन्ह्यात माेक्का अन्वये कलम वाढवले आहे.
मुद्दे
-नाशिकराेड पाेलिसांत मार्च २०२६ मध्ये गुन्हा
-१२०० संशयित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लिपिक आदी रडारवर
-घाेटाळ्याची व्याप्ती नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात
-८४१ शिक्षकांचे आयडी बनावट
- धुळे, जळगावचा मुख्य एजंट प्रशांत वाडीले तुरुंगात
-त्यानंतर शशिकांत हिंगाेणीकर अटकेत
-हिंगोणीकरच्या चौकशीत ‘बड्या माशांची’ नावे निष्पन्न होण्याची शक्यता




