Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजप्लाझ्मा चोरी, भेसळ आणि विक्रीचे धागेदोरे नाशकात! गुजरातमधील टोळीचा पिपासू धंदा

प्लाझ्मा चोरी, भेसळ आणि विक्रीचे धागेदोरे नाशकात! गुजरातमधील टोळीचा पिपासू धंदा

अहमदाबाद । रामदास सोनवणे | Ahmedabad

गुजरातच्या आरोग्य यंत्रणेला हादरवून सोडणारे काही कोर्टीचे प्लाझ्मा (Plasma) चोरी व भेसळीचे आंतरराज्य रॅकेट अहमदाबाद ग्रामीण एसओजीने उघडकीस आणले आहे. आरोपींनी गुजरातमधून चोरलेला आणि भेसळ केलेला नकली प्लाइमा महाराष्ट्रातील (Maharashtra) आठ नामांकित ब्लड बँकांना विकला आहे. आरोपी प्लाझ्मा चोरी करताना कोणालाही संशय येऊ नये म्हणून अस्सल प्लाझ्मा बॅगमधून प्लाझ्मा काढून त्या जागी सलाईन बॉटर मिसळत असत. या भेसळीमुळे प्लाझ्माची गुणवत्ता खालावून त्याचा थेट परिणाम निष्पाप रुग्णांच्या जिवावर होत होता.

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी दिनेश चौधरी आणि मोहन गायकवाड यांनी सहा महिन्यांपूर्वी चांगोदर येथे एक घर भाड्याने घेत तेथे बेकायदेशीर प्रयोगशाळा सुरू केली. मोहन गायकवाड महाराष्ट्रातील विविध ब्लड बँकांमधून प्लाझ्मा गोळा करून आणत असे. तिथे दिनेश चौधरी तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करून अस्सल आणि उच्च दर्जाचा प्लाझ्मा वेगळा करायचा आणि त्या जागी सलाईन बॉटर मिसळून नकली प्लाझ्मा तयार करत असे. हा नकली प्लाझ्मा बाजारात मूळ किमतीच्या अर्ध्या दराने विकला जात होता.

महाराष्ट्रातून वाहनाद्वारे प्लाझ्मा आणणे आणि विविध फार्मा कंपन्या तसेच रुग्णालयांमध्ये पोहोचवण्याचे काम करणाऱ्या जितेंद्र बळदेव सोळंकी आणि रफिक खलिफा (दोघे रा. धोळका) या दोन चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची आणि अन्य दोन मुख्य आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चांगोदर येथील घरातून ११ लाख रुपये किमतीचा ११४० युनिट्स ब्लड प्लाझ्मा, एक डीप फ्रीजर, सीलिंग मशीन, केमिकलच्या बाटल्या, ३४ रिकाम्या प्लाझ्मा बॅग्ज आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक बोलेरो पिकअप वाहन असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुख्य आरोपी चौधरी गुजरातच्या अनेक मोठ्या फार्मा कंपन्यांच्या (Farma Company) कामाशी परिचित होता. त्याला कोणत्या कंपन्यांमध्ये किती प्रमाणात प्लाझ्मा वापरला जातो, याची अचूक माहिती होती. त्यामुळे त्याने फार्मा कंपन्यांमध्ये जाणाऱ्या प्लाझ्माच्या साठ्यापर्यंत पोहोचून, तिथून प्लाझ्मा चोरून तो महाराष्ट्र आणि गुजरातच्या इतर ब्लड बँकांमध्ये पुरवल्याचा कयास आहे. या गंभीर घटनेची दखल घेत राज्य सरकारने राज्यातील सर्व ब्लड बँका आणि प्लाझ्मा कलेक्शन सेंटर्सवर कडक पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात प्लाझ्मा खरेदी करणाऱ्या इतर संशयितांचीही चौकशी सुरू असून लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

रक्तपेढ्यांचे संचालक सहआरोपी

गुजरात पोलीस (Gujarat Police) या घोटाळ्याचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्र पोलिसांना आणि महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला सोपवणार आहेत. महाराष्ट्रातील आठही ब्लड बँकांच्या संचालकांना या गुन्ह्यात सहआरोपी केले जाणार असून, त्यांचे व्यावसायिक परवाने तातडीने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपींनी गुजरातमधील कोणत्याही ब्लड बँकेत अशा प्रकारचा बनावट प्लाझ्मा पुरवला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

महाराष्ट्रात टोळीचे जाळे

या टोळीचे जाळे महाराष्ट्रात खोलवर पसरले असून, आठ नामांकित ब्लड बँकांना २,००० युनिट्सपेक्षा जास्त नकली आणि भेसळयुक्त प्लाझ्माचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे. चौधरी याने सुरुवातीला वाशीम आणि जालना येथील ब्लड बँकांना उच्च गुणवत्तेच्या अस्सल प्लाझ्माची विक्री करून तिथल्या व्यवस्थापनाचा विश्वास संपादन केला. त्या विश्वासाचा गैरवापर करत त्याने आणि त्याच्या टोळीने नाशिक, अहिल्यानगर, धुळे, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील आठ ब्लड बँकांना बनावट प्लाइमा युनिट्स विकले.

मानवी जीवाशी खेळ

छाप्यात जप्त केलेले ११४० प्लाझ्मा युनिट्स तपासणीसाठी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागाकडे पाठवले होते. या तपासणी अहवालानुसार, या प्लाझ्माची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असून तो मानवी शरीरासाठी प्रचंड घातक आणि जोखीमयुक्त आहे.

प्लाझ्मा म्हणजे काय?

रक्ताचा जवळपास ५५% भाग प्लाझ्माचा असतो. यामध्ये ९२% पाणी आणि उर्वरित भागात प्रथिने, अँटीबॉडीज, हार्मोन्स आणि महत्त्वपूर्ण खनिजद्रव्ये असतात. शरीरातील पेशींपर्यंत पोषक घटक पोहोचवणे आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे हे याचे मुख्य काम असते.

प्लाझ्माचे वैद्यकीय महत्त्व

  • गंभीर अपघातात शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेल्यास रक्त गोठण्याची क्रिया सुरळीत होण्यासाठी.
  • प्रसूतीदरम्यान महिलांमध्ये अतिरक्तस्त्राव झाल्यास जीव वाचवण्यासाठी.
  • त्वचा गंभीर भाजल्यास शरीरातील द्रवाचे संतुलन राखण्यासाठी.
  • रक्तसंबंधित हिमोफिलिया किंवा ज्या रुग्णांच्या रक्तात रक्त गोठवणारे घटक नसतात त्यांच्यासाठी.
  • कर्करोगावरील औषधे आणि विविध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी इंजेक्शन्स तयार करण्यासाठी

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....