Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : 'ट्रेडिंगचे पैसे येणार' सांगून गोरगरिबांचे बँक खाते अन्...

Nashik Crime News : ‘ट्रेडिंगचे पैसे येणार’ सांगून गोरगरिबांचे बँक खाते अन् कार्ड ताब्यात; एक कोटींच्या व्यवहारावर कमिशन, बेटिंग रॅकेटच्या तपासातील वास्तव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर सायबर पोलिसांनी (Nashik Cyber Police) कळवण (Kalwan) येथे उद्ध्वस्त केलेल्या ऑनलाईन फुटबॉल बेटिंग रॅकेटमध्ये गंभीर खुलासा झाला आहे. या रॅकेटची व्याप्ती दीड कोटी रुपयांच्या पुढे गेली असताना, पोलिसांनी आता या टोळीच्या गुन्ह्याची पद्धत समोर आणली आहे. सट्टेबाजीचे काळे पैसे पांढरे करण्यासाठी ही टोळी गोरगरिबांचेच अकाऊंट वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

- Advertisement -

या बुकींचे नेटवर्क नाशिकमधील (Nashik) झोपडपट्ट्या (स्लम एरिया), दुर्गम आदिवासी भाग आणि ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचले होते. तिथे राहणाऱ्या व रोजंदारीवर पोट भरणाऱ्या गरीब मोलमजुरांना ही टोळी आपले सॉफ्ट टार्गेट बनवत होती, असे उघड झाले आहे. आमचे ट्रेडिंगचे पैसे येणार आहेत, आम्हाला फक्त दोन महिन्यांसाठी तुमचे बँक खाते वापरू द्या, अशी बतावणी करत होते. पैशांची निकड असलेल्या या गोरगरिबांना जाळ्यात ओढून त्यांचे मूळ पासबुक, एटीएम आणि डेबिट कार्ड संशयित आपल्या ताब्यात घेत होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

बँक खात्यांचा (Bank Account) ताबा मिळाल्यानंतर या खात्यांवरून थेट लाखो-करोडोंची उलाढाल केली जात होती. ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या ट्रॅन्झंक्शनसाठी बँक खातेदाराला ठरलेल्या टक्केवारीनुसार कमिशन दिले जात होते. तर दुसरीकडे, छोट्या-मोठ्या म्हणजेच १०, २० किंवा ३० हजारांच्या छोट्या ट्रॅन्ड्रॉक्शनसाठी एकाच वेळी १० ते १५ हजार रुपये रोख देऊन गरीब खातेदारांचे तोंड बंद केले जात होते. हातात पडणाऱ्या या काही हजारांच्या रकमेसाठी हे मजूर आपल्या खात्यावर होणाऱ्या बेकायदेशीर व्यवहारांची माहिती पोलिसांना देत नव्हते, असेही उघड झाले आहे.

५४ बँक खातेदार रडारवर

नाशिकमधून जप्त करण्यात आलेल्या ५४ बँक पासबुक आणि २६ डेबिट कार्डच्या आधारे सायबर पोलिसांनी आता या सर्व खातेदारांचा शोध सुरू केला आहे. या गोरगरिबांची संशयित बुकींशी ओळख कशी झाली? त्यांनी नेमके किती कमिशन घेतले? या अंगाने तपास पुढे सरकवला जात आहे.

कोणीही पैशांचे किंवा ट्रेडिंगचे आमिष दाखवून पासबुक किंवा एटीएम कार्ड मागत असेल तर ते अजिबात देऊ नका; त्यातून याचा वापर आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉडसाठी होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी बाळगावी.

  • संजय पिसे वरिष्ठ पोलिस निरीक्षक,सायबर पोलिस ठाणे

मुद्दे

  • – टार्गेट : ग्रामीण भाग, स्लम आणि आदिवासी पाड्यांमधील अत्यंत गरीब, गरजू मोलमजूर.
    – भूलथाप : आमचे ट्रेडिंगचे पैसे येणार आहेत असे सांगून दोन महिन्यांसाठी बँक खाते, पासबुक आणि डेबिट कार्डचा ताबा मिळवणे.
    – टक्केवारी कमिशन : ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या मोठ्या व्यवहारांवर खातेद-ाराला ठरलेली मोठी टक्केवारी देणे.
    – फिक्स रेट (तोंड बंद) : १०, २० ते ३० हजारांच्या छोट्या व्यवहारांसाठी एकाच वेळी १० ते १५ हजार रुपये रोख देऊन मजुरांचे तोंड बंद ठेवणे.
    – पोलीस कारवाई : ५४ बँक खातेदार आणि २६ डेबिट कार्डधारकांचा माग काढून सायबर पोलिसांकडून कसून चौकशी.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...